Congress : ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे… इक आग का दरिया है और डूब के जाना है… जिगर मुरादाबादी यांचा हा शेर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीसाठी तंतोतंत लागू होतो. ‘ये निवडणूक नहीं आसाँ… इक आग का दरिया है’ याची प्रचिती दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना यायला लागली आहे. मतदानाची तारीख तर घोषित झाली, पण उमेदवार निवडताना नाकीनऊ येणार आहेत. नागपूर जिल्ह्यात केवळ सत्ताधारी भाजपच नव्हे तर काँग्रेसपुढेही मोठे आव्हान आहे. हे आव्हान प्रतिस्पर्ध्यांमुळे नव्हे नाराज बंडखोर आणि अंतर्गत गटबाजीमुळे निर्माण होणार आहे.
नागपूर जिल्हा म्हणजे काँग्रेस असेच समीकरण पूर्वी होते. अक्षरशः काँग्रेसचा दबदबा होता. पण हळूहळू काँग्रेस एक-दोन जागांवर येऊन पोहोचली. सत्तेची हवा डोक्यात गेली आणि जागा कमी होत गेल्या. अशात 2014 मध्ये मतदारांनी सावनेरमध्ये सुनील केदार वगळता अख्खा जिल्हा भाजपच्या हाती दिला. रामटेकमध्ये आशीष जयस्वाल यांच्यामुळे शिवसेनेचे अस्तित्व होते. तिथेही मल्लिकार्जून रेड्डींच्या रुपाने कमळ फुलले. ग्रामीणचा विचार केला तर सावनेर (काँग्रेस) वगळता रामटेक, उमरेड, काटोल, हिंगणा आणि कामठी या सर्व जागांवर भाजपने झेंडा गाडला. काँग्रेसचा जवळपास सुपडा साफ झाला.
नागपूर शहरात आज उत्तर आणि पश्चिम काँग्रेसकडे आहे. 2014 मध्ये तर सगळ्या सहा मतदारसंघांमध्ये भाजपने बाजी मारली होती. उत्तर नागपूरसारखा मतदारसंघ भाजपकडे आला होता, ही आश्चर्याची बाब मानली गेली. अनेकांनी मोदी लाटेत हे सारे झाल्याचे म्हटले आणि लगेच 2019च्या निवडणुकीत ते सिद्धही झाले. नागपूर पश्चिम हा भाजपचा गड मानला जायचा. याठिकाणी आतापर्यंत सहावेळा भाजप आणि पाचवेळा काँग्रेसने बाजी मारली आहे. पण 2019 मध्ये विकास ठाकरे यांनी तोही पूर्णपणे काँग्रेसच्या बाजुने झुकवला. यंदाच्या निवडणुकीतही हा मतदारसंघ काँग्रेससाठीच अनुकुल असल्याचं बोललं जात आहे.
Election Commission : विधानसभेपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का!
आता चित्र वेगळं आहे
2019 नंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. दोन्ही पक्षांमधून बाहेर पडलेला मोठा गट भाजपसोबत आला. राज्यात महायुती नावाचे नवे समीकरण तयार झाले. पण काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते स्वीकारले नाही, याची प्रचिती लोकसभेच्या वेळी आली. राज्यात महायुतीला जोरदार दणका बसला. गडकरींनी जी काही कामे गेल्या काळात केली आहेत, त्यानुसार त्यांना किमान 4 लाखांची आघाडी अपेक्षित होती. पण महाराष्ट्रातील राजकारणाने त्यांचेही नुकसान केले. त्यांचा विजय झाला, पण धड दिड लाखांची आघाडीदेखील ते घेऊ शकले नाहीत. भाजपच्याच लोकांनी त्यांच्यासाठी काम केलं नाही, अशीही चर्चा आहे.
दक्षिण, मध्य नागपूर धोक्यात
दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते यांना तिकीट दिले तर सुधाकर कोहळे काम करणार नाहीत, असे बोलले जाते. 2019 मध्ये कोहळेंचे तिकीट कापून मोहन मतेंना देण्यात आले होते. तो राग आजही त्यांच्या मनात आले. त्यामुळे गेल्यावेळी काठावर पास झालेले मते यांच्यापुढे त्यांच्याच पक्षाचे आव्हान आहे. शिवाय मध्य नागपूरमध्ये हलबा मते मोठ्या प्रमाणात आहेत. विद्यमान आमदार विकास कुंभारे हलबा आहेत. पण त्यांच्या नावाला पक्षातून विरोध आहे. त्यामुळे उमेदवार बदलल्यास इथेही भाजपचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
रामटेक, काटोलमध्ये बंडखोरीची भीती
रामटेकमध्ये अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांना महायुतीची उमेदवारी निश्चित आहे. पण भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी यांचा जयस्वाल यांना विरोध आहे. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टीही झाली. त्यामुळे ते बंडखोरी करून जयस्वाल यांची मते कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. त्यात काँग्रेसने चांगला उमेदवार दिला तर त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख किंवा सलील देशमुख यांच्यापैकी एकाचे आव्हान भाजपपुढे असेल. पण सध्या भाजपमध्येच आशीष देशमुख आणि चरणसिंग ठाकूर यांच्यात जुंपलेली आहे. त्यामुळे आशीष देशमुखांना तिकीट मिळाले तर ठाकूर काम करणार नाहीत, असे बोलले जाते.