Nagpur : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव महाराष्ट्र बचाव’ कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चाच्या ३०-४० कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या. मुळात या कार्यक्रमाला मर्यादित लोकांची उपस्थिती होती. परंतु भाजयुमोच्या काही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांमुळे संविधान बचावचा विषय परत चर्चेला आला. श्याम मानव यांच्या मुद्द्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली.
कारवाई होणार का
वाचाळवीरांना कारवाईचा इशारा देणारे नेते आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. ‘सेल्फ गोल’ करणाऱ्या भाजयुमो पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपला विरोधकांच्या ‘संविधान खतरे में’ या नॅरेटिव्हचा मोठा फटका बसला होता. भाजपच्या नेत्यांनी ही बाब मान्यदेखील केली होती. त्यानंतर गेल्या काही महिन्यात भाजपचे सर्वच नेते विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह मांडत जनतेची दिशाभूल केली असा मुद्दा मांडला.
बऱ्याच अंशी संविधान बचावचा मुद्दा मागे पडला. हरयाणातील निकालानंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली. मात्र भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी परत एकदा या मुद्द्याला हवा देण्याचे काम केले. आपल्या कृतीतून भाजप नेत्यांना अडचणीत आणले आहे. श्याम मानव यांच्या कार्यक्रमाचा विषयच ‘संविधान बचाव महाराष्ट्र बचाव’ हा होता. तेथे प्रसारमाध्यमांचे फारसे प्रतिनिधीदेखील नव्हते. त्यामुळे मर्यादित प्रसिद्धी मिळणार होती. मात्र शिवानी दाणी यांच्या नेतृत्वात भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी 2014 नंतरच संविधान कसं काय धोक्यात आले हे सांगा, असा प्रश्न विचारला. त्यानंतर गोंधळ झाला.
अशी झाली प्रसिद्धी..
अनेक वर्तमानपत्रांना या कार्यक्रमाची माहितीदेखील नव्हती. मात्र गोंधळ झाल्यावर सर्वांनीच तिथे धाव घेतली. या गोंधळाचे विरोधकांकडून निश्चित राजकारण होईल. महायुतीवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येईल. संविधानाचा मुद्दा परत जनतेपर्यंत नेण्यावर भर असेल अशीच चिन्हे दिसून येत आहेत.
महाविकास आघाडीच्या पथ्यावर
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रकार महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. संविधानाला धोका नाही, हे लोकांना समजावून सांगताना भाजपच्या नाकीनऊ आले. अशात कसेबसे चित्र सकारात्मक झाले होते तर हा प्रकार घडला. ही घटना महाविकास आघाडीसाठी निवडणूक प्रचारात अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याच जवळच्या लोकांनी हा प्रकार केल्यामुळे त्याची अधिकच चर्चा होत आहे.