Black Money : विधानसभा निवडणूक काळात काळ्या पैशांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागनेही अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून प्रलोभन दाखविले जाण्याची शक्यता असते. अशात मतदारांना पैसे, मद्यपुरवठा आदींचे आमिष दाखविले जाणार नाही, यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आयकर विभागालाही आवश्यक त्यात सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. विदर्भातील आयकर विभागही यासाठी सज्ज झाला आहे.
निवडणूक काळात काळ्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभाग बारीक नजर ठेवणार आहे. नागपूर येथील उप आयकर संचालक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी ही माहिती दिली. निवडणूक काळात होणाऱ्या पैशांच्या अपहाराची माहिती नागरिकांना थेट आयकर विभागाला देता येणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सअॅप आणि ई-मेल आयडीही कार्यान्वित केल्याची माहिती खडसे यांनी दिली.
थेट करा तक्रार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशांचे व्यवहार रोखण्यासाठी नागरिकांनी आयकर विभागासोबत यावे, असे खडसे म्हणाले. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल, आदी संशयास्पद बाबींची तक्रार नागरिकांना करता येणार आहे. तक्रार करणाऱ्यांचा तपशिल आयकर विभाग गुप्त ठेवणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आयकर विभागाने खास क्रमांक सुरू केले आहेत. फोनवरून तक्रार देण्यासाठी आयकर विभागाने 1800-233-0356 हा क्रमांक सुरू केला आहे. याशिवाय नागरिकांना व्हॉट्सअॅप (What’s App) वरून फोटो व व्हिडीओ पुराव्यांसह तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9403390980 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ई-मेलवर तक्रार करण्यासाठी विदर्भातील नागरिकांना nagpur.addldit.inv@incometax.gov.in या ई-मेल आयडीचा वापर करता येणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना nashik.addldit.inv@incometax.gov.in या ई-मेल आयडीवर मेलने तक्रार करता येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्यास्तरावरही स्थानिक प्रशासनानं भरारी पथकांची नेमणूक केली आहे. यात महसूल विभाग, पोलिसांचा समावेश आहे. नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात आहे. तपासणी करताना व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून नेमण्यात आलेली पथकं स्थानिक प्रशासनाप्रमाणे चौकाचौकात नसले, तरी त्यांची आर्थिक उलाढालीवर बारीक नजर राहणार आहे. नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक माहितीची आयकर विभाग शहानिशा करणार आहे. प्रसंगी कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे.