Congress on MNS : एखादा नेता पक्ष सोडून गेला की पक्षात फारसे उत्साहाचे वातावरण नसते. काहींना आनंद झाला असतो तर काहींना बला टळली असे वाटत असते. शेगावात मनसे कार्यकर्त्यांच्या कृतीतून अशीच प्रचिती आली. मनसेच्या एका नेत्याने सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. बरं झालं पक्ष सोडून गेलात, अशा भावनेतून आनंद साजरा केला. या घटनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे.
नेत्यांना आनंद
बरेचदा एखादा नेता पक्ष सोडून गेल्यावर कार्यकर्ते व इतर नेत्यांना आनंद झालेला असतो. पण तो दाखवता येत नाही. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना मात्र हा आनंद लपवता आला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात राज्याच्या पदाधिकाऱ्याने पक्ष सोडणे चांगले संकेत नाहीत. पण तरीही बुलढाणा जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी शेगावात पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार आतषबाजी केली. त्यानंतर विठ्ठल लोखंडकार यांच्या फोटोवर काळ्या शाईने फुली मारली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढाऱ्यांची पक्षबदलाची मालिका सुरू आहे. जागावाटप, उमेदवार, मतदारसंघाचे दौरे, सभा, पक्षांतर या घडामोडींना वेग आला आहे. यात बुलढाणा जिल्ह्याही मागे नाही. विशेषतः मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मनसेला झालेला आनंद विशेष लक्ष वेधून घेत आहे. निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात महाराष्ट्र नवनिर्मण सेनेला धक्का बसला आहे. मनसेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीसाठी मोठी तयारी करीत असतानाच मनसेला मोठं खिंडार पडल्याचे मानल्या जात होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुलडाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी लोकसभेत देखील मतदारसंघाचा आढावा घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नेते, कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी ‘ग्रीन सिग्लन’ मिळाला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. परंतु मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांना लोखंडकार यांच्या पक्षातून जाण्याचं दुःख वाटलं नाही. त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी लोखंडकार यांचा ‘पक्षाला लागलेली कीड’ असा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोखंडकार यांच्यावर गंभीर आरोप
विठ्ठल लोखंडकार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व काही दिले. मान, सन्मान, पद हे सर्व असताना त्यांनी पक्ष सोडला. मात्र खऱ्या अर्थाने आता पक्षाला उभारी मिळणार आहे. मनसेला लागलेली कीड दूर झाली आहे. आता पक्षात इन्कमिंग सुरू झालेले आहे. लोखंडकार यांनी पक्षाला दावणीला बांधलेले होते. त्यांचा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भाला कुठलाही फायदा नव्हता. कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना ओळखतही नव्हते, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटाखालील जिल्हा अध्यक्ष अमितबापू देशमुख यांनी केला आहे.
Mallikarjun Reddy : नेत्यांची झोप काढणे भोवले; सहा वर्षांसाठी हकालपट्टी
कुत्रं ओळखत नव्हतं
विठ्ठल लोखंडकार यांच्या काँग्रेस प्रवेशाने मात्र मनसेला कोणताही फरक पडलेला नाही. याउलट मनसेमध्ये असलेली अनेक दिवसांची कीड निघून गेली असल्याचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. मनसेने अनेकांना आजवर मोठमोठ्या पदावर नेऊन पोहोचविले. आजवर ज्याला गल्लीतलं कुत्र सुद्धा ओळखत नव्हत त्याला एका उच्च पदावर राज साहेबांनी नेऊन ठेवले. जिल्ह्याच्या संपर्क पदाची जबाबदारी ज्याच्याकडे होती. त्याचा मात्र जिल्ह्यात कोणत्याही कार्यकर्त्या सोबत साधा संपर्क सुद्धा नव्हता. त्यांच्या जाण्याने नव्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोखंडकार यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर नाईलाजास्तव इतर पक्षात काम गेलेले पदाधिकारी कार्यकर्ते लवकरच मनसेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत, असं बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी सांगितले.