Chandrapur Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर मतदारसंघातून विद्यमान वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढणार आहेत. भाजपचे ते उमेदवार असतील यात दुमतच नाही. ऐन निवडणुकीपूर्वी मुनगंटीवार यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या संदर्भातील पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल केले आहेत.
एक व्हिडीओ चंद्रपुरात सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. बल्लारपूर तालुक्यातील इटोली गावातील देवा पिपरे या व्यक्तीने हा भावनिक व्हिडीओ तयार केला आहे. देवा पिपरेने तयार केलेल्या या व्हिडीओत मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला आहे. आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मुनगंटीवार कधीही जात पाहत नाही. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम ते तितक्याच आपुलकीनं करतात.
सुधीर मुनगंटीवार यांचं तोंड भरून कौतुक करताना देवाने आपल्या व्हिडीओत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीकाही केली आहे. धानोरकर यांनी आमदार असताना आणि आता खासदार असताना कोणती कामं केली, असा प्रश्न देवानं विचारला आहे. हे सांगताना त्याने मुनगंटीवार यांनी केलेल्या कामांचा उल्लेखही केला आहे.
वास्तविकता काय?
देवा पिपरे यानं तयार केलेला हा भावनिक व्हिडीओ वस्तुस्थितीवर आधारित असल्याचंच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकाचं म्हणणं आहे. मुनगंटीवार यांच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची गर्दी असते. तेथे येणाऱ्या प्रत्येकाला सौजन्यपूर्ण वागणूक दिली जाते, असं परिसरातील नागरिकांनी सांगितलं. मुनगंटीवार यांनी स्वत: व सेवाभावी संस्थांच्या मदतीनं अनेक आरोग्य तपासणी शिबिरं घेतली.
चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना दुर्धर शस्त्रक्रियेनंतर जीवदान मिळाले. अर्थमंत्री असताना त्यांनी निराधारांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ केली, ही बाबही रेकॉर्डवर आहे. चंद्रपुरात झालेली सैनिकी शाळा, वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन केंद्र, बचत गटांच्या महिलांना मिळालेला रोजगार, रस्त्यांची कामं, एलईडी पथदिवे ही सगळी कामं दिसणारी अशी आहेत, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
अनेक गावांमध्ये लागलेले वॉटर एटीएमही लोकांना डोळ्यानं दिसतात. त्यामुळे मुनगंटीवार यांनी केलेला प्रत्येक विकास दिसतो, हे लोक मान्य करतात. असं असतानाही विकासाऐवजी लोक जात, पात, धर्म, पंथ यांना का थारा देतात, असा प्रश्न देवा पिपरे याने आपल्या व्हिडीओतून उपस्थित केला आहे. आपल्या जातीचा असेल पण लोकांच्या अडचणीत कामाला धाऊन जात नसेल तर असा नेता काय कामाचा, असा प्रश्नही देवानं उपस्थित केला आहे.
Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडी म्हणजे ‘नापास विद्यार्थी’!
जाती व्यवस्थेमुळे इंग्रजांनी भारतात अनेक वर्ष ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली. लोकांना जातीच्या नावावर ‘ब्लॅकमेल’ करायचं आणि सोन्यासारख्या देशाला लुटून आपलं घर भरायचं असं इंग्रजांनी केलं. आता इंग्रज निघून गेले असले तरी त्यांच्या नीतीचा आजही काही जण वापर करतात. त्यामुळं खरोखर जात महत्वाची की विकास हे विचारण्याची वेळ आता आली असल्याचा प्रश्न देवा पिपरेनं आपल्या व्हिडीओतून उपस्थित केलेला दिसत आहे.