Panic In Political Circle : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकीचे पत्र आले आहे. तीन दिवसांपूर्वीच त्यांना पत्र आलं होतं. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी पुन्हा धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख पत्रात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच याच व्यक्तींने पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमकी दिली होती. नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच नवनीत राणा यांना तीन दिवसांत धमकीचे दोन पत्र आले आहेत. सामूहिक अत्याचारसह घरासमोर गायीची कत्तल करणार असल्याचे पत्रात नमूद होते. पत्र पाठविणाऱ्या आमिरने 10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. पाकिस्तान झिंदाबाद असेही पत्रात लिहिले होते. चिठ्ठीत आपला फोन नंबरही लिहिला. पत्रात नवनीत राणा यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. रवी राणा यांच्याबद्दल अशोभनीय वाक्य लिहिण्यात आले होते.
पोलिसांत तक्रार
रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पुन्हा 14 ऑक्टोबर रोजी राणा यांना आणखी एक पत्र आलं आहे. आधीच्या पत्रानंतर अमरावती पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलिस हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. अशात आता धमकीचं दुसरं पत्र आलं आहे. त्यानंतर अमरावती पोलिसांनी राणा यांच्या घरी जात तपास सुरू केला. पोलिसांनी दुसऱ्या पत्राचाही तपास सुरू केला आहे. या पत्राबाबतही अमरावती शहरातील राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.
झाला होता पराभव
एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राणा विधानसभा निवडणुकीत उतरणार का, अशी उत्सुकता आहे. राणा यांचे पती आमदार रवी राणा हे बडनेऱ्यातून निवडणूक लढणार आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. नवनीत राणाही कामाला लागल्या आहेत. अशातच त्यांना धमकी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत राणा यांनी हैदराबादला भाजपचा प्रचार केला होता. त्यांचे हैदराबाद येथील भाषणही गाजले. आता त्यांना हैदराबादहूनच धमकीचे पत्र आले आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत.