या लेखातील मते लेखकाची आहेत, या मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही
Political War : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची अनेकांना उत्सुकता असते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता वेगवेगळे दोन मेळावे होऊ लागले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. या मेळाव्यातून जनतेचे कोणते उद्बोधन झाले किंवा त्यांना कोणता विचार मिळाला हा प्रश्नच आहे. दोन्ही मेळाव्यात फक्त आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या गेल्या.
विधानसभेत विजयी करून द्या
राज्यातील जनता आपल्याला आधीपेक्षाही जास्त यश मिळवून देईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा महायुतीचाच भगवा फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपल्या सरकारने समाजातील घटकांना न्याय मिळवून दिला आहे. देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.समाजातील सर्व घटक सरकारच्या कामकाजावर खुश आहेत.लाडकी बहिण, लाडका भाऊ, जेष्ठ नागरिक, शेतकरी हे सर्वच सरकारचे ब्रॅंड अँबेसिडर आहेत असे त्यांनी सांगितले.हि-यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना हिंदू शब्दांची ॲलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची त्यांना लाज वाटते. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही लोकांची जीभ कचरते. आपल्याला हा शब्द उच्चारयाला अभिमान वाटतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. त्यामुळे आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे असे त्यांनी सांगितले. हा मुख्यमंत्री लपून बसणारा नाही रस्त्यावर उतरणारा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब म्हणाले होते अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले असते. महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता. सरकार सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्यासाठी काम केले. लोक म्हणत होते हे सरकार 15 दिवस टिकणार नाही. आम्ही टीका करणाऱ्यांना पुरून उरलो. दोन वर्षे पूर्ण केली आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही, मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
उदाहरण दिले..
आम्ही उठाव केला नसता तर महाराष्ट्राचे चित्र काय असते हे त्यांनी गमतीशीर उदाहरण देऊन सांगितले. तुम्हाला फेसबुक लाईव्हवर पहावे लागले असते. मोरु सकाळी उठला, आंघोळ केली. मोरु परत झोपला. मोरु मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत गल्लोगल्ली फिरत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना दिल्लीतील नेते मंडळी मातोश्रीवर येत होती आता काळ बदलला यांना पदासाठी दिल्लीची पायरी गाठावी लागत आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तुम्हाला तुमचे सहकारी मुख्यमंत्री म्हणून स्वीकाराला तयार नाहीत तर राज्यातील जनता तुमचा मुख्यमंत्री म्हणून कसा स्वीकार करेल, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगल्या विकास कामांना स्पीड ब्रेकर लावण्याचे काम केले. आम्ही त्या सरकारला उखडून फेकले. मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही काय काम केले हे आम्ही सांगतो. तुम्ही मुख्यमंत्री असताना कोणती कामे केली ते तुम्ही सांगा, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.लोकसभेप्रमाणे गाफील राहू नका. फेक नरेटिव्ह खोडून काढा. विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
निर्णय रद्द करू
आपले सरकार सत्तेवर आल्यास महायुती सरकारने घेतलेले सर्व अनावश्यक निर्णय आपण रद्द करू अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना केली. चुकीचे टेंडर रद्द करू. नियमबाह्य कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाला भारतीय म्हणायला लाज वाटायला पाहिजे. सगळी चित्रविचित्र, भ्रष्टाचारी माणसं एकत्र करून तुम्ही राज्य करीत आहात. गद्दारांना आणि चोरांना नेता म्हणून तुम्हाला आमच्याशी लढावे लागते, याच्यातच तुमचा पराभव आहे असे टिकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
Baba Siddique : तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
ठाकरे विरूद्ध शिंदे
भारतीय जनता पक्षाला देशात विरोधी पक्ष नको आहे. फक्त भाजपच राहिला पाहिजे ही त्यांची वृत्ती आहे. महाराष्ट्रात यांना कोणी विचारात नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांद्यावर घेऊन फिरलो. आजही आमची इच्छा आहे राजकारणात भाजपला खांदा द्यायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आवेशात सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. एकमेकांना जमेल तसे डिवचले. उध्दव ठाकरे यांनी तर सत्ता पक्षातील मंडळींचा लांडगे असा उल्लेख केला. त्यांना शब्दांतून जेवढे हिणवता येईल तेवढे हिणवले. राजकीय मंडळी आता एकमेकांकडे विरोधक म्हणून नव्हे तर शत्रू म्हणून बघत आहेत. सत्ता कायम टिकत नाही. राजकारणात परिवर्तन हे होतच असते. या वास्तवाचेभान मात्र कोणालाच राहीलेले नाही.