Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष प्रवेशाला वेग आला आहे. अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची शक्यता आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार असल्याची शक्यता आहे. सुलभा खोडके यांनीही प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही तसा दावा केला आहे.
राजकीय घडामोडी
विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच काँग्रेसमध्ये आपल्याला सातत्याने डावलल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. सुलभा खोडके यांनी म्हटलं, ‘मला काँग्रेसमध्ये सातत्याने डावललं गेलं. मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं जात नाही. मी काँग्रेसप्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझे फोन घेतले नाही. त्यांनी मला उत्तर दिलं नाही,’ असे गंभीर आरोप काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी केले आहेत. काँग्रेसकडून डावलले जात असल्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेतही सुलभा खोडके यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सुलभा खोडके या राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशापासून सुरुवात झाली आहे. लवकरच अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभाताई खोडके यांचा पक्षप्रवेश होणार आहे. रविवारी खोडके या अमरावतीत एका मेळाव्यात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. राष्ट्रवादीतील इनकमिंगची सुरूवात सिने अभिनेते सयाजी शिंदेपासून सुरू झाल्याचं मिटकरी म्हणाले.
काँग्रेसला मोठा धक्का
दरम्यान अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे खोडके यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. मी विरोधी पक्षाची आमदार असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला विकास कामासाठी भरीव मदत केली. आणि मला निधी दिला आहे. त्यामुळे ते 13 तारखेला अमरावती असल्याने त्यांचा सत्कार मी करत आहे. दरम्यान सध्या मी काँग्रेसमध्येच आहे असा दावाही काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी केला.