Assembly Election : रिपाई आठवले गटाचे प्रमुख मंत्री रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे टेंशन वाढवले आहे. त्यांनी तिन्ही पक्षांनी रिपाईसाठी जागा सोडाव्या असे म्हटले आहे. असे झाले नाही तर पाठिंबा देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उत्तर नागपूर, यवतमाळमधील उमरखेड आणि विदर्भात आणखी दोन आणि उत्तर महाराष्ट्राची जागा मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही 20 जागांचा प्रस्ताव दिला. पण 8 ते 9 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजे. यासंदर्भात तिन्ही पक्षांनी बसून निर्णय घ्यावा. तीन पक्ष आपसात जागा ठरवत आहेत. पण तिन्ही पक्षांनी आम्हाला तीन-तीन जागा द्याव्यात. आम्ही वाट पाहतो आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 जागा देऊ म्हणाले होते. भाजपचा जिथे विद्यमान आमदार नाही त्याठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यावी. त्यासाठी माझे महायुतीमधील पक्षांसोबत बोलणे झाले आहे,’ रामदास आठवले म्हणाले. दोन जागा जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही महायुतीचा प्रचार करण्यासाठी सक्षम असल्याचेही ते म्हणाले. सत्य आल्यानंतर बाकीचा जागेचा विचार केला तरी चालेल असे आश्वासन त्यांनी महायुतीला दिले.
धर्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा प्रमुख सण आहे. जगभरातील लाखो बौद्ध अनुयायी या दिवशी एकत्र येऊन हा सण साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात त्यांच्या 5 लाखांहून अधिक अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. या दिवसाचे प्रतिक म्हणून, दरवर्षी 14 ऑक्टोबरला मुख्यतः दीक्षाभूमी आणि आता संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. याच अनुषंगाने रामदास आठवले नागपुरातील दीक्षाभूमी इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादासाठी प्रत्येकवेळी येत असल्याचे सांगितले.
आरपीआयचा देशभर विस्तार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा रिपब्लिकन पक्ष आहे. हा पक्ष देशभर वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे, असं आठवले यांनी म्हटलं. नागपूरमध्येच 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत या पक्षाचा माणूस म्हणून मी जगणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
म्हणून पक्षाचे नुकसान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई आणि भंडाऱ्यात पराभव झाला. म्हणून त्यांनी एक व्यापक पक्ष उभारण्याचा विचार केला. रिपब्लिकन नावाची संकल्पना त्यांच्या मनात होती. परंतु त्यांच्या हयातीत या पक्षाची स्थापना होऊ शकली नाही. या पक्षामध्ये आधीपासूनच गटबाजी राहिलेली आहे. म्हणून हा पक्ष समोर गेला नाही. यामुळेच समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मनसेत का जायचे?
रामदास आठवले यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मी इथे असल्यामुळे मनसेत जाणार नाही. राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या होतात. मात्र त्यांना मतं मिळत नाहीत. सुरवातीला त्यांना 13 आमदार मिळाले. पण नंतर त्यांना आमदार मिळाले नाही. ते स्वतंत्र लढणार आहेत. आता अनेक आघाड्या झाल्या आहेत,’ असं रामदास आठवले म्हणाले.