Vijay Wadettiwar on Mahayuti : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. भाजपने 90 पैकी 49 जागा जिंकत बहुमताचा टप्पा पार केला. तर, काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसला फक्त 37 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. विरोधकांनी पसरविलेले ‘फेक नेरेटिव्ह’ संपले आहे. हरियाणाच्या निवडणुकीतून हे दिसून आलं. लोक आता भाजपच्या पाठीशी आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
हरियाणातील विजयामुळे महायुतीचे नेते हुरळून गेले आहेत. पण हरियाणाचा प्रभाव महाराष्ट्रात दिसणार नाही. जनता विधानसभेत त्यांचा निकाल लावून देईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महायुतीला दादा नकोच
मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार दहा मिनिटांत बाहेर पडले. त्यांनी बैठक मध्येच का सोडली, याबद्दल वडेट्टीवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ‘महायुतीत वाद नेहमीचे आहेत. प्रत्येक कॅबिनेटमध्ये वाद होतात. महायुतीच्या नेत्यांनी अजित पवार यांनाही बाजुला सारण्याचे प्रयत्न सुरु केले असावेत. अजित पवार अनेक वेळा विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या बेशिस्त कारभार सुरु आहे.’
महायुती सरकारने पैसे नसताना जीआर काढले गेले. हे निर्णय टक्केवारी मोजण्यासाठी घेतले जात आहेत. अजितदादांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. महायुतीत तर भाजप नेते अजितदादा यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
फक्त महायुतीचाच फायदा
मंत्रिमंडळाच्या बैठकीत क्रीमिलेअरची मर्यादा 8 लाखावरुन 15 लाखांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली. क्रिमिलेअरची मर्यादा पंधरा लाख करणे ही शुद्ध धूळफेक आहे. हे निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून केलेले काम आहे. आतापर्यंत बुद्धी भ्रष्ट झाली होती का? आतापर्यंत निर्णय का झाला नाही? ओबीसींची मतं मिळवण्यासाठी हे निर्णय केले आहेत. ही फक्त राज्य सरकारची शिफारस आहे, केंद्र सरकार काय निर्णय घेते यावर बरच काही अवलंबून आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सारंकाही मंत्र्यांच्या हितासाठी
यांचा वाद राज्यातील जनतेच्या हितासाठी नाही तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हितासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तिजोरीत पैसा नसताना 80 निर्णय घेतले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत? निर्णय घेताना खर्च किती करावा? याचा कुठलाही ताळमेळ राज्य सरकारमध्ये नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विदर्भात काँग्रेसची ताकद
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली. त्याचप्रमाणे विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. काही जागांवर आम्ही वारंवार पराभूत झालो असलो तरी त्या ठिकाणी शरद पवार गटाची किती ताकद आहे हे पहावे लागेल. आम्ही तिथे हरलो म्हणून जागा सोडावी असं होत नाही. मेरीटप्रमाणे निर्णय होईल. जिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसने लढावं. जेव्हा आम्ही हरलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जागावाटप जवळपास झाले आहे. आता 50 ते 55 जागांचा प्रश्न शिल्लक आहे. 14 तारखेच्या अखेरच्या बैठकीत निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
राणे आरएसएसच्या चालीवर
अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या घटनेनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. पोलिसांना जाहीर सभेत धमकी देण्यात येते. नितेश राणे हे चक्क भाजप आणि आरएसएसच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत, असा आरोप सुद्धा त्यांनी केला. आरएसएस आणि भाजपमधून ते प्रशिक्षण घेत आहेत. म्हणून त्यांची वागणूक अशा प्रकारे होत चालली आहे. जनता या लोकांना साथ देणार नाही. महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवेल. हरियाणा जिंकले म्हणून महायुती विदर्भ जिंकेल काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.