Shiv Sena : महायुतीत मतदारसंघाच्या दाव्यावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यातच आता अकोट मतदारसंघातही शिवसेनेने शड्डू ठोकला आहे. अकोटमध्ये सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी शिंदे गटाकडून मागणी केली जात आहे. या मतदारसंघासाठी माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघाच्या दाव्यांवरून महायुतीत मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
महायुतीत रस्सीखेच
विधानसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. इच्छुकांच्या तयारीला ही वेग आला आहे. अशातच इच्छुकांच्या दाव्यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अकोला जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. पाच पैकी चार मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर एका मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. दरम्यान महायुतीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अद्यापही एकाही मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी जाहीर झाली नाही. तर दुसरीकडे आता दावे प्रतिदावे करण्यात येत असल्याने मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांवर भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. पाचही आमदार भाजपचे रहावे यासाठी प्रयत्न करा, भाजपपासून दुरावलेल्या सर्वसामान्य मतदारांना जोडा, जनसंवाद वाढवा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले होते. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला होता. आता अकोट मतदारसंघावरही शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी दावा ठोकला आहे. तर यापूर्वी बाळापूर या मतदारसंघावर महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला होता. राष्ट्रवादीतील काही इच्छुकांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडूनही बाळापूर साठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.
इच्छुकांचे प्रयत्न
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेची युती होती. यावेळी जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक लढले होते. तर एक मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्यावर आला होता. यावेळी भाजप सेनेच्या युतीने पाचही मतदारसंघावर विजय मिळविला होता. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंची शिवसेना ही भाजप सोबत आहे. दरम्यान बाळापूर मतदारसंघात तर शिवसेनेने दावा केलाच आहे. तर अकोट मतदारसंघ हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं म्हणत हाही मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न चालवले आहेत.
सध्या या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. तर भाजपकडून या मतदारसंघासाठी आणखी काहीजण इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या इच्छुकांमध्ये माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांचेही नाव आहे. यासह इतरही भाजपमधील इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघाच्या दाव्यावरून महायुतीत मोठी ओढाताण होणार आहे.
Anup Dhotre : खासदार मंत्र्यांना म्हणाले अकोल्याला टेक्सटाइल हब करायचेय
अकोल्यातील पाच पैकी दोन मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी अकोल्यातील अकोट आणि बाळापूर हे दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. तर बाळापूर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आधीच दावा केल्याने महायुतीत अकोला जिल्ह्यातील काही मतदारसंघावरून मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून पाच पैकी चार मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असल्यानं चारही मतदारसंघावर दावा केला आहे.
माजी आमदार राहिलेले बाजोरिया हे स्वतः अकोट साठी इच्छुक आहेत. त्यांनी या मतदारसंघात दौरे देखील वाढविले आहेत. त्यांच्या कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन या मतदारसंघात करण्यात येत आहे. अद्यापही महायुतीचे उमेदवार ठरले नाहीत. मात्र अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघात दाव्या प्रतिदाव्या मुळे राजकारण रंगले आहे. दरम्यान उमेदवारी न मिळाल्यास काहीजण बंड खोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणते मतदारसंघ कुणाला सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.