Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार राज्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. त्या अंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (7 सप्टेंबर) साकोलीच्या विश्रामगृहावर झाल्या. यात तीन्ही विधानसभांपैकी साकोली विधानसभेसाठी केवळ नाना पटोले यांच्या व्यतिरिक्त एकही अर्ज आला नाही. भंडारा आणि तुमसर मतदारसंघांमधून 22 उमेदवारांची नावे इच्छुकांच्या यादीत पुढे आहेत. त्यांनी मुलाखतीही दिल्या आहेत. पण नानांच्या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक बॅकफुटवर गेले आहेत, असे बोलले जात आहे.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी 10 वाजतापासून मुलाखतीला सुरुवात झाली. साकोली विधानसभा क्षेत्रात एक, तुमसरमध्ये 8 आणि भंडारासाठी 13 इच्छुक उमेदवार असून, त्यापैकी नाना पटोले वगळता 21 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. दरम्यान तुमसर विधानसभेसाठी 7 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात शंकर राऊत, देवा इलमे, प्रमोद तितीरमारे, राजेश हटवार, अनिल बावनकर, खेमराज पंचबुद्धे, रमेश पारधी यांचा समावेश होता.
भंडारा विधानसभेसाठी 14 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्यात संदीप डोंगरे, अरविंदकुमार जगणे, मनोज बागडे, प्रेमसागर गणवीर, पृथ्वीराज तांडेकर, धनंजय तिरपुडे, विकास राऊत, राजकपूर राऊत, पूजा ठवकर, राजविलास गजभिये, युवराज वासनिक, अरविंद भालाधरे, रोषण जांभुळकर, डॉ. अतुल टेंभुर्णे यांचा समावेश होता.
साकोलीत ‘ना-ना’
साकोली विधानसभा क्षेत्रासाठी एकमेव नाना पटोले यांचेच नाव यादीत होते. तीन महिन्यांपूर्वी जिल्हा काँग्रेस कमेटीने त्यांचे नाव प्रस्तावित केले होते. अन्य नावे नसल्याने येथे त्यांच्याच नावाची चर्चा आहे. या मुलाखत प्रक्रियेत मात्र ते सहभागी नव्हते. दुसरीकडे 22 उमेदवारांच्या यादीत फक्त एकमेव पूजा ठवकर यांचेच नाव आहे. त्यांनी भंडाऱ्यासाठी मुलाखत दिली. महिला सक्षमीकरणाच्या या युगात फक्त एकच महिला इच्छुक म्हणून पुढे आली, हे विशेष ! यावर पक्षनेते काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
इच्छुकांचा उत्साह
यासंदर्भात सतीश चतुर्वेदी प्रतिक्रियेत म्हणाले, ‘सातही जागांवरील इच्छुक उमेदवार उत्साही आहेत. सत्ताधाऱ्यांबाबत जनतेत रोष आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी होता तोच राग आजही कायम आहे. त्यामुळे भंडारा-गोंदियाच्या सातही जागा काँग्रेसने लढाव्यात, अशी एकगठ्ठा मागणी सर्व कार्यकर्त्यांनी केली आहे.’ असे असले तरी, यावर निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले.