विधानसभा निवडणुकीची घोषणा आता पुढील आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपची चर्चा सुरू आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांसह महायुतीमधील छोट्या पक्षांनाही स्थान देण्यात येणार आहे. महायुतीमधील पक्षांनी जिंकलेल्या जागा अपवाद वगळता त्यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची यादीसुद्धा एकत्रित जाहीर करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली आहे. असं असलं तरी 90 जागा अशा आहेत ज्याबाबत एकमत होऊ शकलेले नाही. या जागांवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे या जागांबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. या जागांवर तातडीने निर्णय घ्या, अशा सूचना अमित शाह यांनी केल्या आहेत. शिवाय येत्या दोन दिवसांत तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून या जागांबाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आता या 90 जागांवर मार्ग काढण्याची जाबाबदारी टाकण्यात आली आहे.
विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाची ती जागा हे सूत्र अंतिम करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या जे आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा मिळणार हे निश्चित झाले आहे. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार कमजोर असेल ती जागा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना सोडली जाईल. ज्याचा उमेदवार मजबूत त्याला ती जागा असेही सूत्र ठरले आहे. अशावेळी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती महायुतीतल्या प्रत्येक पक्षाची आहे.
सध्याच्या स्थितीत जागा वाटपाबाबत जरी एकमत झाले नसले तरी पहिली यादी जाहीर करण्यावर एकमत झाले आहे. यादी जाहीर करण्याचा मुहूर्तही ठरला आहे. त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होईल, अशी चर्चा आहे. यात केवळ भाजप उमेदवारांची नावे असतील की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचीही नावे असतील हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पण दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
पहिल्या यादीत अनेकांचा समावेश
महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी असणार आहे. या यादीत तिन्ही पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्या जागांवर वाद आहेत, त्या नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु लोकसभेसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून महायुतीने विधानसभेत जोरदार तयारी केली आहे. अनेक जागांवर उमेदवारांची नावेसुद्धा निश्चित झाली आहेत. लोकसभेत उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्यामुळे काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. ऐनवेळेस उमेदवारी जाहीर झाल्यामुळे प्रचारास वेळ मिळाला नाही. तोपर्यंत विरोधी उमेदवाराचे प्रचाराचे दोन, तीन टप्पे पूर्ण झाले होते.