Administrative Negligence : भंडारा जिल्हातून गोंदियाच्या विभाजनाला 24 वर्ष झाली आहेत. विभाजनानंतरही कार्यालय अद्यापही भंडारा शहरातच आहेत. त्यामुळे कामानिमित्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय नाही. या भागात अनेक गैरप्रकार सुरू आहेत. गोंदियात मोठ्या प्रमाणात राइस मिल आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणाचा विषयही गंभीर झाला आहे. आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे अशिक्षिताना शिक्षित करण्याचा विषयदेखील गरजेचा आहे. मात्र या सर्वच विषयांशी निगडीत विभागांचे ऑफीस अद्यापही भंडाऱ्यातच आहेत.
अधूनमधून शासनाचा दंणका आल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी गोंदियात दर्शन देतात. त्यानंतर मात्र भंडारा ते नागपूर असाच त्यांचा कार्यक्रम असतो. त्यामुळे गोंदियात सर्व सरकारी कार्यालयं व्हावी, अशी मागणी आहे. त्याला आणखीब किती वर्षे लागतील? असा सवाल उपस्थित होत आहे. भंडारा जिल्ह्याचे 1 मे 1999 मध्ये विभाजन झाले. नवीन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. एक-दोन प्रकल्प वळगता सिंचनाचा अनुशेष गोंदियात आहे. आरोग्य व शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.
अक्षम्य दुर्लक्ष
गोंदिया जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. अनेक महत्त्वाच्या कार्यालयांचा कारभार भंडारा येथुनच चालततो. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना 100 किलोमीटर अंतर कापावे लागते. राज्याच्या अगदी सुरुवातीला पूर्व दिशेला वसलेला गोंदिया जिल्हा आदिवासी क्षेत्र आहे. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशी गोंदियाची ओळख आहे. जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर आजही अनेक शासकीय कार्यालये गोंदियात नाहीत. हे सर्व कार्यालय भंडारा जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांना भंडारा येथेच चकरा माराव्या लागतात.
जिल्हा निर्मितीपासून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय नाही. प्रादेशिक रस्ते वाहतूक अधिकाऱ्याचा पत्ता नाही. अन्न व औषध विभागचे सहाय्यक संचालक भंडाऱ्यात आहेत. निरंतर शिक्षण अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ भंडाऱ्यातच आहे. या कार्यालयांमधूनच गोंदिया जिल्ह्याचा कारभार चालतो. लोकांना काम पडले तर त्यांना भंडारा येथे जावे लागते. अनेकदा पैसे आणि वेळ वाया जातो. कामही होत नाही. त्यामुळे लोक निराश होतात.
Gondia Transfer : प्रशासनाची महसूल विभागात लाडका कर्मचाऱ्यांची योजना
मोठा व्याप
गोंदिया जिल्हयात एकूण आठ पंचायत समिती आहेत. नऊ एकात्मिक बालविकास प्रकल्प आहेत. 556 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 42 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. 245 प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा विस्तार आहे. 13 ग्रामीण रुग्णालय आणि 1 हजार 77 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. 22 माध्यमिक, 14 उच्च माध्यमिक शाळा आहेत. 1 हजार 600 अंगणवाड्यांचा समावेश आहे. 150 मिनी अंगणवाडी आहेत. 75 पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. 1 हजार 392 माजी मालगुजारी तलाव आहेत. सिंचनासाठी दोन मोठे प्रकल्प आहेत. 10 मध्यम प्रकल्प आणि 19 लघुप्रकल्पांचा गोंदियात समावेश आहे. मात्र जिल्हा निर्मितीला 24 वर्षे लोटूनही अनेक सरकारी कार्यालयांची वानवा आहे.