साताऱ्याच्या फलटणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे निंबाळकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. कार्यकर्ते जे म्हणतील तो निर्णय घेणार, असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय. आता हर्षवर्धन पाटलांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांना रामराजेंच्या निर्णयाने मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपाला तर शनिवारी अजित पवारांच्या पक्षाला ‘धक्के पे धक्का’! बसल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीपुर्वी राजकीय वातावरण पुर्णपणे महायुतीच्या बाजूने होतं. परंतु महाविकास आघाडीला लोकसभेत मोठ यश मिळाल्याने आता विधानसभेला राज्यातील सर्व राजकीय वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले आहे. याचाच भाग म्हणून भाजपचे अनेक नेते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करतांना दिसत आहेत. भाजप नेते समरजीत घाटगे यांच्यानंतर शुक्रवारी हर्षवर्धन पाटलांनी देखील भाजपला रामराम ठोकला आहे. यातच आता अजित पवार गटातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
शरद पवारांशी संपर्कात
अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे निंबाळकर हे घड्याळाची साथ सोडून तुतारीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. यावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील राजकीय संकेत दिले आहेत.
Assembly Elections : कॉंग्रेसकडून तब्बल 1 हजार 688 उमेदवार इच्छूक
तुम्ही अजित पवार यांची साथ सोडून तुतारीत प्रवेश करणार आहात का ? यावर कार्यकर्ते जे म्हणतील तो निर्णय घेणार आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. यासाठी ते फलटणमध्ये लवकरच मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांनतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. काही दिवसांपुर्वी सोळशी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे भाषण सुरू असताना विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर नाराज झाले आहेत. दरम्यान, फलटणमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात लोकसभा निवडणूकीत शाब्दिक वारही झाले होते.