Assembly Election : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदार नितीन देशमुखही सुरतला गेले होते. पण आमदार देशमुख परत आले. आता आमदार देशमुख यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटावर पुन्हा नव्याने जुनेच असलेले गंभीर आरोप केले आहेत. देशमुख म्हणाले, शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्याला भाजपच्या एका आमदाराने हे सांगितले, असा दावा त्यांनी केला. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहिलेले आमदार नितीन देशमुख यांनी एका सभेत पुन्हा जुन्या घटनाक्रमाला उजाळा दिला.
आमदार देशमुख अर्ध्या रस्त्यातूनच परत आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक आरोप केले होते. पुन्हा एकदा देशमुख यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला. बंडाच्या वेळी दिल्लीवरून एक फोन आला होता. कोणत्याही परिस्थितीत देशमुख परत जाता कामा नये. गरज भासली तर त्यांचा ‘गेम’ करून टाका, असे निर्देश आल्याचे या आमदाराने आपल्याला सांगितल्याचे देशमुख म्हणाले.
चौकशीचा ससेमिरा
आमदार देशमुख म्हणाले, शिंदे गटाने आपली चौकशी सुरू केली. आपल्या मुलासह आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचीही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी लावली. पण आपण डगमगलो नाही. आपल्याला सुरतमध्ये इंजेक्शन देण्यात आले. तेव्हा देशमुखांना हृदयविकाराचा झटका आला, असे सांगण्यात आले. आपल्याला हृदयविकाराचा कोणताही झटका आला नव्हता. आपल्याला मारण्याचा हा कट होता, असंही देशमुख म्हणाले.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सध्या शिवसेनेचे नेते राज्यात अनेक ठिकाणी दौरा करीत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोल्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत देशमुख यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर हल्लाबोल केला.
देशमुखांनी मात्र पुन्हा एकदा तेच जुने आरोप आणि तोच घटनाक्रम उकरून काढला. त्यामुळे मतदारसंघातील लोकांना त्यांनी आपल्या जीवावर उठलेल्या लोकांना साथ देणार का? असा भावनिक प्रश्न विचारण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्नच केला. सद्य:स्थितीत शिवसेनेकडून भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर पूर्ण ताकदीने हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गट यांनाच सर्वाधिक लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे हे जीवे मारण्यापर्यंतही खालच्या पातळीला जाऊ शकतात, हे देशमुख यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.