Demand For Rights : कामगारांना होणारा त्रास, मनस्ताप वाचविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नोंदणी व कीटवाटप करावे, यासाठी भंडाऱ्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या केबिनमध्ये तब्बल चार तास ठाण मांडले. अधिकाऱ्यांना घेराव घातला. आयुक्तांनी तालुकास्तरावर शिबिर घेण्याचे आश्वासन आंदोलनानंतर दिले आहे.
कंत्राटदारामार्फत कीट वाटप करताना सावळागोंधळ सुरू आहे. योग्य नियोजन व सोयीसुविधा संबंधित केंद्रावर नाहीत. चार दिवसांआधी भंडारा येथील अग्रसेन भवन येथे कीट वाटप झाले. त्यावेळी महिलांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे महिला जखमी झाल्या. तालुकास्तरावर कामगार कीट वाटप केंद्र असावे, असा नियम व शासनाचा जीआर आहे. मात्र साहित्याचे वाटप फक्त भंडारा मुख्यालयातच सुरू होते. गेल्या 15 दिवसांपासून नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगारांना साहित्य वाटत होत आहे. सुरक्षा कीट व गृहपयोगी साहित्याचे वाटप जिल्हास्तरावर सुरू आहे.
श्रमिकांना त्रास
ग्रामीण भागातून पायपीट करीत मजुरी बुडवून लाभार्थी भंडाऱ्यात आहेत. उन्हातान्हात त्यांना प्रतीक्षेत उभे राहावे लागते. हा प्रकार लक्षात घेता, सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव घालण्यात आला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त कामगार आयुक्त कार्यालयात तैनात होता. जोपर्यंत तालुकास्तरावर कामगार साहित्य वाटप होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. आंदोलनकर्त्यांची मागणी लक्षात घेत सहाय्यक कामगार आयुक्तांनी भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुका केंद्रांवर साहित्य वाटपाचे आदेश दिलेत.
NCP Sharad Pawar : चंद्रपुरात धक्का; पोंभुर्णाचे ओबीसी तालुकाध्यक्ष भाजपात
सोमवारपासून जिल्ह्यात तालुकास्तरावर कामगार साहित्याचे वाटप सुरू होणार आहे. कामगार साहित्य वाटपात सुसूत्रता येण्यासाठी टोकण सिस्टीम लागू करणे, लाभार्थ्यांना मोबाइलवर ऑनलाइन संदेश पाठविण्याची मागणीही करण्यात आली. वाटपाच्या ठिकाणी टोकण नंबरसाठी स्क्रिन लावण्यात यावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कामगारांसाठी जेवण, पाण्याची व्यवस्था करण्याबाबतही काँग्रेसने चर्चा केली. मागण्या तत्काळ मंजुरही करण्यात आल्या. आंदोलनावेळी माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, कामगार नेते हिवराज उके, सतीश सार्वे, अमोल खोब्रागडे, गिरीश ठवकर, स्वप्नील आरीकर, विनोद निंबार्ते, निखिल इलमे, अनिल कडव व मोठ्या संख्येत कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. साहित्य वाटप करताना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार होती. विशेषत: महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागातून कामगारांना भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी यावे लागत होते. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साहित्य वाटप करावे, अशी कामगारांची मागणी होती.