Buldhana : सध्या आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे. परंतु आज राज्यात नारीशक्तीच असुरक्षित आहे. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये मिळत आहेत. परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी येथे उपस्थित केला आहे. दिशा महिला बचत गटाच्या वतीने आयोजित मेळाव्यात बुलढाण्यात ४ ऑक्टोबरला त्या बोलत होत्या. त्यांनी आपल्या अर्ध्या तासांच्या भाषणात राज्यसरकारवर प्रखर टीका केली. याशिवाय बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आपल्या भाषणातून पुन्हा डिवचले.
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री शेळके यांच्यावतीने तीन दिवसीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंधारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस हेमलता पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमल झंवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव स्वाती वाकेकर, मीनल आंबेकर, वृषाली बोंद्रे, मृणालिनी सपकाळ, महिला उद्योजिका सीता मोहिते, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके, स्वाती कण्हेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे पुन्हा सरकारवर तुटून पडल्या. त्या म्हणाल्या, ‘बेरोजगारी वाढत आहे. नोकऱ्या नाहीत, जे नोकरीवर आहेत, त्यांच्या पेन्शनचे हे सरकार पाहत नाही. मुलाच्या शिक्षणाचे, रोजगाराचे, आरोग्याचे पाहत नाही. मग त्यांच्या पंधराशे रुपयांना भुलणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महिला अत्याचाराच्या घटना पाहता राज्यात पोलिस यंत्रणा शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडत असल्याचे त्या म्हणाल्या.
शिंदेंनी वावर विकून तुम्हाला हे पैसे दिले नाहीत
अंधारे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वावर विकून तुम्हाला हे पैसे दिले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही नागपूरचा बंगला या पैशांसाठी विकलेला नाही. या दोघा, तिघांनी आपल्या खिशात हात घालून पैसे दिले नाहीत. त्यामुळे दणक्यात पंधराशे घ्या. भाऊ बहिणीला मदत करतो तेव्हा तो कुणाला काहीच कळू देत नाही. मात्र, हे सत्ताधारी भाऊ दिलेल्या दीड हजारांची मोठी जाहिरातबाजी करत सुटले आहेत. पंधराशे टिकऱ्या दिल्या नाही अन् त्यासाठी दहा दहा हजारांचा बॅनर असतो. काय धंदा लावला आहे हा? भावाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, बहीण-भावाच्या नात्याचा मान कळतो, इज्जत कळते. तिच्या संसारात कमी जास्त आहे ते बोलून दाखवायचे नसते, हा संस्कार या महाराष्ट्राने आम्हाला दिला आहे.’