गेल्या काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यात आरक्षणाचे चांगलेच वादळ उठले आहे. त्यातच ओबीसी समाजात होणारा धुडघूस खपवून घेणार नाही, असे म्हणत ओबीसी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे इतर समाजही आपले आरक्षण वाचविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरले आहेत. अशातच ओबीसींचा वसतिगृहाचा प्रश्न व इतर सामाजिक, शैक्षणिक आदी विषय प्रलंबित आहेत. यावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्या अनुषंगाने 4 ऑक्टोबरला गोविंदपूर परिसरातील गजानन मंदिर परिसरातील तेलघाणी (खादी ग्रामोद्योग) येथे सायंकाळी 5 वाजता ओबीसी संघटनांची जनसंवाद सभा पार पडणार आहे.
अनेक वर्षांपासून वसतिगृहाचा प्रश्न रेंगाळला आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून वसतिगृह 6 ऑक्टोबरपासून सुरू करणार, असे आश्वासन देण्यात आले आहे. शिवाय शैक्षणिक दृष्ट्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारा आरक्षणाचा लाभ व इतर समस्यांवर सभेत मंथन होणार आहे. या सभेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, ओबीसींचे आंदोलन करणारे रविंद्र टोंगे यांची उपस्थिती असेल. यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, महासंघाचे प्रवक्ते ऋषभ राऊत उपस्थित राहणार आहेत.
Medical College : बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता!
या सभेत ओबीसी वसतिगृहासह ओबीसी समाजाचे आजचे खरे वास्तव व समाजाची खरी स्थिती यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सभेला ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी कर्मचारी, ओबीसी कर्मचारी महासंघ, ओबीसी अधिकार मंच, बहुजन विचार मंच, महात्मा फुले समता परिषद तसेच विविध संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हजर रहावे, असे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार तसेच नवनुियक्ती उपजिल्हाधिकारी प्रणया भालेकर यांचा सत्कार होणार आहे.
ओबीसी आक्रमक
या सर्व घडामोडीत ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. शासनाने वेळीच ओबीसींच्या फायद्याचा निर्णय न घेतल्यास निर्यायक भूमिका घेण्याचा इशारा ही देण्यात येत आहे. शासनही ओबीसींच्या मागण्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. यातील वसतीगृहाबाबत आणि नॉन क्रिमिलियर अटीमध्ये केलेले बदल महत्त्वाचे ठरले आहेत. माजी मंत्री ओबीसी नेते डॉ. परिणय फूके यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.