महायुती सरकारविरोधात शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, नोकरदारांच्या विविध मागण्यांसाठी विक्रमी परिवर्तन मोर्चा काढण्यात आला. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. बुलढाणा मेहकर येथील तहसीलवर गुरुवारी दुपारी हा मोर्चा धडकला. या मोर्चातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मतदारसंघात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची लाट कायम असल्याचे दिसून आले. तसेच, या मोर्चामुळे केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या ‘प्रताप’गडाला पुन्हा एकदा हादरे बसल्याची राजकीय चर्चा रंगली.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. सोयाबीनला ८ हजार, कपाशी व तुरीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा. या मागण्या करण्यात आल्या. अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रतिएकर २४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. मेहकर शहरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा. बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, या मागण्यांचाही यामध्ये समावेश होता.
शेतकर्यांचा पीकविमा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावा, शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्यात यावा, घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा. जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे पूर्ण करावी. महिलांना सुरक्षा देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे.
बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न्याय देण्यात यावा. घरकूल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ देण्यात यावा. जागतीक पर्यटनस्थळ लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी. इत्यादी मागण्यासाठी हा मोर्चा जानेफळ रोडवरील शिवसेना कार्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला.
गद्दारांना धडा शिकवा
या मोर्चात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशीष रहाटे, शहरप्रमुख किशोर गारोळे इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी निष्क्रीय शासनाचा आपल्या भाषणातून समाचार घेवून गद्दारांना धडा शिकवून मेहकर मतदारसंघावर भगवा फडकवा, असे आवाहन मोर्चेकर्यांना केले.
तर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनीसुद्धा शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रश्न मांडले. आता हे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन केले. मेहकरचा आजचा मोर्चा विक्रमी झाला. या मोर्चातून सिद्धार्थ खरात यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.