Politics For Officer : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट आला आहे. आमदार कारेमोरे यांची क्लिप एका माजी नगराध्यक्षानेच व्हायरल केल्याची बाब पुढे आली आहे. हा प्रकार कळल्यानंतर आमदार कारेमोरे यांनी संबंधित पदाधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. दोघांमध्ये चांगलीच ‘तु.. तु.. मै.. मै..’ झाली. मात्र काही मध्यस्थांनी हे प्रकरण शांत केले. आमदार कारेमोरे यांनी नुकताच एका महिला अधिकाऱ्याला फोनवरून जाब विचारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा भंडाऱ्यात झाली. या कार्यक्रमात गैरसोयीचा हा प्रकार आहे.
आलेल्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी खरं तर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होती. मात्र आमदार कारेमोरे यांनी गैरसोयीचा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारला. या प्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण अधिकाऱ्याला जाब विचारला असे आमदार कारेमोरे यांनी स्पष्ट केले. परंतु पक्षाच्या कार्यक्रमातील गैरसोयीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना कसे जबाबदार धरता येईल, या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वीच कारेमोरे यांनी मुंबईकडे निघाल्याचे कारण देत संवाद आटोपता घेतला.
विभीषण शोधला
क्लिक कोणी व्हायरल केली, याचा शोध आमदार राजू कारेमोरे आणि त्यांचे समर्थक घेत होते. अशातच त्यांना घरातील विभीषण सापडला. त्यामुळे कारेमोरे यांनी यासंदर्भातील जाब संबंधित माजी नगराध्यक्षाला विचारला. त्यावरून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. काहीही झाले तरी संबंधित मुख्याधिकाऱ्याची बदली करण्याचा चंग आता आमदार कारेमोरे यांनी बांधला आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याला भंडाऱ्यात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच एका हेवीवेट नेत्याने जोर लावला होता. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या घरातील गड्याप्रमाणे काम करायला हवे, अशी अपेक्षा कदाचित राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली असावी अशी चर्चा आता आहे.
विशेष म्हणजे अजित पवार यांची जनस्मान यात्रा ही सरकारी कार्यक्रम नव्हताच. तो पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर फोनवरील संभाषणाची क्लिप व्हायरल झाली. सुरुवातीला ही क्लिप मुख्याधिकाऱ्यांनीच व्हायरल केल्याचा आरोप होता होता. मात्र राजू कारेमोरे यांच्या किल्ल्याला भगदाड पाडण्याचा प्रयत्न करणारा व्यक्त घरातीलच विभीषण असल्याचे आता पुढे आले आहे. तरीही या सगळ्याचे नैराश्य मुख्याधिकाऱ्यांवर काढण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश तयार करण्यासाठी घाई केली जात आहे. येत्या दोन दिवसात बदलीचा आदेश निघेल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय नेत्याच्या अहंकारासाठी तर शासकीय यंत्रणा एका अधिकाऱ्याचा बळी देत असेल तर लाडकी बहिण वैगरे सारख्या घोषणा किती खऱ्या आहेत, याचा विचार न केलेलाच बरा अशी चर्चा आता आहे.