अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, दोन नंबरच्या काळ्या मुली पानवाल्यांना तर तीन नंबरचा उरलासुरला गाळ शेतकऱ्यांच्या मुलांच्या पदरात पडतो,’ असे वक्तव्य भुयार यांनी केले. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळातूनही भुयार यांच्यावर टीका होत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावतीच्या एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले.
राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार देवेंद्र भुयार हे आपल्या विविध वक्तव्यांमुळे आतापर्यंत अनेकदा चर्चेत आलेले आहेत. यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. त्यांनी मुलींबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांनी जाहीर भाषणात मुलींच्या दिसण्यावरून कमेंट केली. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
काय म्हणाले आमदार भुयार?
‘स्मार्ट पोरगी हवी असेल तर त्यासाठी पोरगा नोकरीवाला पाहिजे. ज्यांचा पानठेला आहे, धंदा आहे किंवा किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते. तीन नंबरचा गाळ, रखडलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचे काही खरे राहिले नाही,’ असे भुयार म्हणाले आहेत. त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
महिलांची टींगल करणे हाच त्यांचा अजेंडा – सुषमा अंधारे
आमदार देवेंद्र भुयार यांच्या या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरुन टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, भुयार यांचे हे विधान शेतकरी मुलांची टिंगल टवाळी करण्याचा प्रकार आहे. सत्ताधाऱ्यांना खात्री आहे की, आपण काहीही केले तरीही आपल्यावर कारवाई होणार नाही, या मस्तवालपणातून अशी वाक्ये येतात. शेतकरी आणि महिलांची टींगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का?, असा सवालही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
Human Trafficking : बदलापूर शाळेचे संचालक पोलिसांच्या ताब्यात!
वादाचा इतिहास
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नादाला लागाल तर तलवारीने हात छाटू,’ असे खळबळजनक वक्तव्य वरुडचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिवसांपूर्वी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भुयार बोलत होते. ‘मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती. आजही आहे आणि उद्याही राहील. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागायचं नाही. यापुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला हात लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही,’ असं ते म्हणाले होते. ‘जुना देवेंद्र भुयार अंगात आणायला लावू नका’, असा दम यावेळी आमदार भुयार यांनी दिला होता.