Tug Of War : लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपचे पानीपत झाले आहे. नागपूर वगळता विदर्भातील एकही लोकसभेचा उमेदवार स्वबळावर निवडून आलेला नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये तर भाजपची परिस्थिती यापेक्षाही बिकट होण्याची चिन्हे आहेत. हा कोणत्याही खासगी एजन्सीचा सर्वे नाही, तर शासकीय गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या पाहणीमध्ये हा निष्कर्ष समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपला काहीसा धोका आहे. परंतु अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तर भाजप मायनसमध्ये असल्याचे सरकारी आणि खासगी यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजप समोर सर्वाधिक धोका आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी भाजपचे गोवर्धन शर्मा यांना तगडी टक्कर दिली. अवघ्या अडीच हजार मतांनी गोवर्धन शर्मा गेल्या निवडणुकीत विजयी झालेत. परंतु आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला तारण्यासाठी गोवर्धन शर्मा देखील नाहीत. शर्मा यांचे निधन झाल्यानंतर हा मतदारसंघ रिक्त झाला होता. लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. परंतु न्यायालयीन प्रक्रियेनंतर ही निवडणूक टळली. आता विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचा नवीन आमदार कोण असेल, याचा फैसला होणार आहे.
भाजपने व्हावे सावध
सध्या राज्यभरात महायुती बद्दल विरोधाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तर अनेकांनी महायुतीला नाकारले. त्यामुळे हवेत चालणारी भाजप जमिनीवर आदळली. भाजपच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रमध्ये हेकेखोरी सुरू केली होती. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुधातील माशीप्रमाणे बाजूला काढण्यात आले होते. मतदारांनाही गृहीत धरण्यात आले होते. विकासकामे केली नाही तरी, ‘मोदी है तो मुमकिन है..’ केवळ अशी घोषणाबाजी करून विजय मिळवतात येतो हा गैरसमज भाजपचा होता. मात्र मतदारांनी लोकसभा निवडणुकीत हा गैरसमज खोडून काढला. लोकसभा निवडणुकीत तयार झालेला हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान दुपटीने वाढला आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना यंदा सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणांनी निवडणूक लढणे टाळता आले तर बरं होईल, असा सल्ला दिला आहे.
अशातच अकोला पूर्वपेक्षा अकोला पश्चिम मतदार संघात भाजपला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सध्या भाजप आकडेवारीच्या बाबतीत मायनसमध्ये आहे. या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साजिद खान पठाण हेच विजयी होऊ शकतात, यावर गुप्तचर यंत्रणांनी देखील शिक्कामोर्तब केले आहे. याला अनेक कारणेही आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपवर ही परिस्थिती ओढवण्याला पक्षातीलच काही नेते कारणीभूत आहेत. आता हेच नेते विधानसभा निवडणुकीत आमदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी धडपडत आहेत. मात्र त्यांनी रोवलेल्या चुकीच्या बिजाचे फळच आता त्यांना भोगावे लागणार आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांसमोर आपण कितीही दावेदारी केली तरी, आपलीच सीट धोक्यात आहे हे देखील या इच्छुकांच्या लक्षात आले आहे.
Akola West : महायुतीत दुसऱ्या पक्षाला मतदारसंघ सुटावा यासाठी प्रयत्न
खोटेपणा कायम
भाजपचे काही नेते नुकतेच अकोल्यात येऊन गेले. या नेत्यांसमोर काही इच्छुकांनी आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी खोटे सर्वेक्षण आणि खोटा पाठिंबा दाखवून दिला. मात्र काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिल्यास संबंधित इच्छुकांनाही तोंडघशी पडावे लागणार आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी समोर काहीही बोलत नसले तरी त्यांनी सर्वेक्षणाच्या आधारावरच उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय केला आहे. भाजपला विधानसभा निवडणुकीत सत्ता टिकवायची असेल तर चापलुशी करणाऱ्यांना नव्हे तर खरोखर विजय मिळवण्याची ताकद असलेल्यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. भाजपच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे हेकेखोरी कायम ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत आहे त्यापेक्षाही पक्षाचे मोठे नुकसान होईल या दुमत नाही.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात हिंदू विरुद्ध गैरहिंदू मतदार अशी थेट लढत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे आतापर्यंत भाजपने दुर्लक्ष केले. निवडणूक जवळ आली म्हणून भाजपने पुन्हा या मतदारसंघात हिंदुत्वाचे कार्डवर काढले आहे. मात्र या आता याला बराच उशीर झाल्याची गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षातील मतदारांचे प्राबल्य बऱ्यापैकी वाढले आहे. यातील अनेकांचे अवैध व्यवसाय आहेत. सिंडिकेट तयार करून ही मंडळी मोक्याच्या जागेवरील भूखंड देखील खरेदी करतात. या सर्व प्रकाराकडे भाजपने दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर महापालिकेत सत्ता असताना सुद्धा अशा लोकांना साथ दिली जे या अवैध आणि भूखंडाच्या व्यवसायात कार्यरत होते. त्यामुळेच विरोधकांची वोट बँक अधिक बलवान झाली. भाजपचाच वापर करून विरोधकांनी आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपलाच मोठे आव्हान उभे केले आहे.
विकासाचे मुद्दे
अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाने बोंब आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपकार केले म्हणून अकोल्यात उड्डाणपूल आणि अंडरपास झाला. परंतु हे कामही निकृष्ट दर्जाचे झाले. लोकार्पण होताच उड्डाणपूल बंद पडला. अंडरपास मध्ये तर लोकार्पण झाल्यापासून गटारगंगाच वाहत आहे. अकोला पश्चिम मधील अनेक रस्त्यांची परिस्थिती दयनीय आहे. किल्ला चौक ते बाळापूर नाक्यापर्यंतचा रस्ता अनेक महिने झाले तरी अर्धवट आहे. असे अनेक रस्ते अकोल्यात आहेत, ज्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे विकासाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत भाजपसाठी अडचणीचा ठरणार आहे. इतकेच नव्हे तर अकोल्यातील गैरहिंदू मतदार आता चांगलाच ताकदवान झाला आहे. हाच मतदार भाजपला अडचणीचा ठरणार आहे.
कोणाचा होणार विजय..
भाजप मध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अनेक दावेदार आहेत. परंतु या सर्व दावेदारांना यंदा विजयासाठी मोठे आव्हान सहन करावे लागणार आहे. भाजपमध्ये बंडखोरीची ही प्रचंड मोठी शक्यता आहे. कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती अकोल्यात आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाचीही फायनल झाली तरी भाजपचा विजय सोपा नाही असे खासगी सर्वेक्षण एजन्सी आणि सरकारी गुप्तचर यंत्रणांचेही म्हणणे आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी हे तीन फॅक्टर अकोल्यात भाजप समोर मोठे आव्हान आहे. त्यातच गैरहिंदू मतदारांची वाढलेली प्रचंड ताकद पाहता भाजपने येथे ‘ओव्हर कॉन्फिडन्स’मध्ये राहू नये असा सल्ला दिला जात आहे. याकडे पक्षाने गांभीर्याने न पाहिल्यास यंदाच्या निवडणुकीत भाजपचा सूर्य पश्चिमेला अस्त होऊ शकतो.