Chandrapur News : जगातील सर्वप्रथम शिक्षित व्यक्ती महर्षी वाल्मिकी असावे. त्याला कारणही तसेच आहे. त्यांच्या हातामध्ये लेखणी दिसते. महर्षी वाल्मिकी हे मच्छीमार व भोई समाजासाठी आदर्श आहेत. वाल्मिकी यांच्यामुळेच राम जगाला कळले. वाल्मिकी यांनी शब्दबद्ध केल्यामुळेच राम लोकांपर्यंत पोहोचले. वाल्मिकी नसते तर रामायण नसते असे मत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे ते बोलत होते. महर्षी वाल्मिकी यांच्या मुळेच प्रभू श्रीरामचंद्र यांची ओळख आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
कोणताही फोटो बघा. महर्षी वाल्मिकी यांच्या हातात लेखणी दिसेल. यावरून सर्वांनी धडा घेतला पाहिजे. रामायण किती वर्षांपूर्वी घडले मला ठाऊक नाही. त्याचा इतिहास किती जुना आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. पण महर्षी वाल्मिकी नसते तर रामचंद्रांची ओळख जगाला झाली नसती. रामचंद्र यांचे रामायण लिहून त्यांची ओळख करून देणारे महर्षी वाल्मिकी हेच आहेत. हे कोणीही विसरता कामा नये, असे वडेट्टीवार म्हणाले.
अंधश्रद्धेपासून वाचा
मच्छीमार, भोई किंवा बहुजन समाज अंधश्रद्धेला बळी पडतो. खरं सांगावे तर, कोणाच्याही अंगात देवी वगैरे येत नाही. हे सगळं खोटं आहे. टीव्हीवर जे लोक येतात प्रवचन सांगतात ते पैसे कमविण्यासाठी व धंदा करण्यासाठी येतात. भूत, प्रेतसुद्धा काहीही नसते. बहुजन समाज यामध्येच जास्त अडकलेला आहे. मेहनत केल्याशिवाय तुमच्या पदरात कोणीही देव टाकू शकत नाही. श्रद्धा असू द्या. भक्ती असू द्या. परंतु कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही, हे देखील लक्षात असू द्या. अंधश्रद्धेतून आधी बाहेर पडले पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
खंड पडू देऊ नका
आपले वाल्मिकी समाजबांधवांना सांगणे आहे की, मुलांच्या शिक्षणात कुठेही खंड पडू देऊ नका. हा निर्धार प्रत्येकाने करावा. भविष्यात जगापुढे हा समाज जाणार आहे. सकाळी जागे झाल्यावर मच्छी मारू. ती विकू. त्यातून चरितार्थ चालवू. एवढ्यापुतचे मच्छीमार, भोई समाजाने मर्यादीत राहू नये. त्यांनी आपल्या पिढ्या घडवाव्या. शिकवाव्या. समाज कोणताही असो. येणारी पिढी उच्च शिक्षणानेच पुढे जाणार आहे. त्यामुळे आमची मुलं शिकायलाच हवी, अशी गाठ बांधली पाहिजे. शिक्षणानेच नोकरी मिळणार आहे. शिक्षण प्राप्त केल्यानेच व्यवसायाच्या माध्यमातून येणारी पिढी प्रगती करू शकते, असेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले.