Ajit Pawar : भंडारा जिल्ह्यात तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दौऱ्यावर येणार आहेत. असे असले तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुहूर्त मिळालेला दिसत नाही. त्यामुळे पाहुणे म्हणून येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुमसर-भंडारा मुख्य मार्गावरील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागेल. त्यांची जनसन्मान यात्रा खड्ड्यातूनच प्रवास करेल, हे जवळपास निश्चित आहे.
रस्त्यांची दुरावस्था
अवघ्या सहा दिवसांवर नवरात्रोत्सव आला आहे. अशात तुमसर शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. त्यात भर म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारही जिल्ह्यात येत आहेत. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरु झाले नाही. तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांच्या कार्यालयापुढेच सर्वाधिक खड्डे आहेत. एकूणच यंदा नवरात्र उत्सवात तुमसर शहरातील रस्ते नागरिकांसाठी भीतीदायक ठरणार आहेत.
तुमसर शहरात प्रवेश करताना कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, जुना एसटी बस स्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुढे नेहरू, बावनकर, मस्जिद चौक सराफा लाईन समोरील रस्ताही खराब झाला आहे. जैन मंदिर चौकातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे तुमसर-सिहोरा-बपेरा मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
नागरिकांना त्रास
भंडारा-तुमसर मार्गावरून अनेक अधिकारी व शासकीय कर्मचारी दररोज ये-जा करतात. शाळकरी मुलांचीही याच रस्त्यावरून ये-जा सुरू असते. वाहनांची सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांची दुरुस्ती होत नाही, असे गाऱ्हाणे तुमसरकरांनी मांडले आहे. विशेष म्हणजे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शनिवारी तुमसर येथे येणार पोहोचणार आहे. भंडारा रोडवरील रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून किती गांभीर्याने सोडविला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे.
अमित मेश्राम भंडारा जिल्ह्याचे तुमसर शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम यांच्याशी ‘द लोकहित’ने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘नवरात्रोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. मात्र, सध्या तुमसर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. रवी वाढई यांच्या नेतृत्वात जनआंदोलन करण्यात येईल.’
जिल्ह्यातही तीच परिस्थिती
तुमसरसारखीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. रस्त्यावर खड्डे की खड्डात रस्ते असा प्रश्न पडण्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे प्रशासन रस्ते दुरुस्ती करण्यासाठी जीव जाण्याची वाट पहात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.