Mahila Arthik Vikas Mahamandal : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपण राहतो. शिवाजी महाराजांनी स्त्रीयांना प्रचंड सन्मान प्रदान केला. महिलांचे स्थान आजही सर्वोच्च आहे. त्यामुळेच आपण नारीशक्तीचा जयजयकार करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे देव्हाऱ्यातील ईश्वराप्रमाणे स्त्रीचा सन्मान आहे, असे विचार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा येथे महिला आर्थिक विकास महामंडळाकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रपुरात होणाऱ्या सुसज्ज सोलर व्यावसायिक संकुल ( बाजार हाट )आणि सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राबाबत महत्वाची माहिती जाहीर केली. बाजार हाट साठी 80 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.
लवकर नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वीच मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात नारीशक्तीचा जागर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळेच ‘नारी से नारायणी’ची संकल्पना मांडली. देशात लखपती दिदी योजना आणली. महाराष्ट्रातही लेक लाडकी योजना सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे. या माध्यमातून महिलांचा सन्मान केला जात आहे. चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल ठेवण्यासाठी आपण नेहमीच आग्रही असतो. बांबू रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून चंद्रपुरातील महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांनी तयार केलेल्या शेतकरी गटाच्या वस्तू विक्री करता येतील यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
सुसज्ज व्यवस्था होणार
चंद्रपुरातील महिलांसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. उपलब्ध जागेवर मॉल उभारण्यात येईल. या संकुलात सौर ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विजेचा वापर करण्यात येणार आहे. यातून मुनगंटीवार यांनी पर्यावरणपुरकतेचा पुन्हा एकदा परिचय दिला. या घोषणेतून त्यांनी महिलांना सशक्त करण्यासोबतच आपण पर्यावरणाप्रती जागरूक असल्याचे दाखवून दिले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे (SNDT) केंद्र बल्लारपुरात होत आहे. त्यातून 72 प्रकारचे अभ्यासक्रम मुलींना उपलब्ध होणार आहेत.
दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या नावाने चंद्रपुरात कौशल्य विकास केंद्र होत आहे. 11.50 कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च होणार आहे. या केंद्रातील महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळात प्रशिक्षणाची मदत मिळणार असल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले. पोंभूर्णा येथे विकासामुळे कायापालट झाला आहे. परंतु विकासाच्या मार्गावर येथेच थांबता येणार नाही. त्यामुळे पोंभूर्णामध्ये रोजगाराच्या आणखी व्यापक संधी उपलब्ध करून देणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
2 लाख 75 हजाराच्या वर महिलांना लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर चंद्रपुरात जिल्ह्यातील 2 लाख 75 हजाराच्या वर महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे. अद्यापही नोंदणी सुरूच आहे. चंद्रपुरातील काही महिलांनी बँकेच्या खात्याबाबत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनाही मुनगंटीवार यांनी दिलासा दिला. यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. महिलांना एसटीतून निम्म्या दरात प्रवासाची सवलत मिळत आहे. महायुती सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.