Assembly Election : विदर्भातील जनतेचा विश्वास भाजपने गमावला आहे. महाविकास आघाडीला विदर्भात भरघोस यश मिळेल. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ होईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते नागनपुरात बोलत होते. प्रसार माध्यमांशी बोलताना बुधवारी (ता. 25) वडेट्टीवार म्हणाले की, भाजपला सर्वांत मोठा फटका विदर्भातच बसणार आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका विदर्भातच बसला. विधानसभा निवडणुकीतही भाजपला याच भागातील मतदार नाकारतील.
पराभवाचा सामना
नरेंद्र मोदी (Narendra Modi) अनेकदा विदर्भात येऊन गेले. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जिथे जिथे सभा घेतली, त्या प्रत्येक ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर येथे मोदी यांनी सभा घेतली असती, तर कदाचित येथेही भाजपचे पानीपत झाले असते. त्यामुळे विधानसभा निवडणूक काळातही मोदी जितके वेळा विदर्भात येतील, तितका फायदा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल आहे. लोकसभा निवडणुकीत हे भाजपला दिसते. त्यामुळे ते घाबरेल आहेत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
पक्ष फुटणार
आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षातून कोणतेही ‘आऊटगोइंग’ होणार नाही. उलट आता काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’ सुरू होईल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना आता लंबी लाइन लागणार आहे. कारण महायुतीचे काय होणार, हे सर्वांना दिसत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. भाजप मोक्याच्या जागा कंत्राटदारांच्या घशात घालत आहे. जागा हडप करण्याचा हा प्रकार राज्यभर सुरू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
दुप्पट भूमिका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे योजना राबवायची असा प्रकार सुरू आहे. भाजपचा हा दुटप्पीपणा लोकांच्या लक्षात येत आहे. बदलापूर येथील बालिकांवरील अत्याचार प्रकरणावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अक्षय शिंदेच्या चकमकीमागे मोठे षडयंत्र आहे. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयला मारण्यात आले आहे. अक्षयचा कोणीही बचाव केलेला नाही. पण या प्रकरणातील खऱ्या दोषींना वाचविण्यासाठी जर त्याला मारण्यात आले असेल, तर या संपूर्ण प्रकरणातील तथ्य बाहेर आलेच पाहिजे. यासंदर्भात वस्तुनिष्ठ चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले.