Anganwadi : मुलांना चक्क शिळं अन्न आहारात दिलं जात असल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सरकारकडून अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प अंतर्गत हा प्रकार होत आहे. भंडारा जिल्हाच्या तुमसरात अभ्यंकर नगर, हनुमान नगर यासह इतर भागात मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात आहे. आहारामध्ये सोंडे आणि अळ्या आढळून आल्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून हा आहार येत आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षपणे तपासणी
बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे, अशी माहिती अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी दिली. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांना ही माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी तथ्य उघडकीस आले. मुक्ताबाई अंगणवाडीत पाठविलेल्या बालकांना चांगल्या पद्धतीचा आहार मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी याबाबत नगरपरिषदेच्या सहायक प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे यांच्याकडे तक्रार केली. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पौनीकर यांच्याकडेही अनेकदा तक्रार केली. त्यानंतरही संबंधित अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकेने शिवसेनेकडे केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (19 सप्टेंबर) सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी मुक्ताबाई अंगणवाडी केंद्र क्रमांक 93, 94, 95 (411) यामध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून बालकांना निकृष्ट पोषण आहार दिला जात असल्याचे लक्षात आले. गरम पोषण आहारात अळ्या व सोंड्या दिसून आल्या. याबाबत अंगणवाडी सेविकेकडून अनेकदा तक्रार करण्यात आली. तरीही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. येथे साधी पाहणी सुध्दा केली जात नाही.
मुलांची प्रकृती बिघडली
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पौनीकर, सहायक रचना घरवार यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेने निवेदनाद्वारे माहिती दिली. रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून शिळे, बुरशी, जाळे असलेले अन्न बालकांना देण्यात येत आहे. यामुळेच मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये बालकांच्या प्रकृती बिघडत असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेने गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. लहान मुलांच्या जीवाशी खेळ करून निकृष्ठ आहार पुरवठा करणाऱ्या संबंधित बचत गटावर नियमानुसार कारवाई करून चौकशीही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यासह काही पालक वर्ग उपस्थित होते.
शिवसेनेचा पुढाकार
अमित मेश्राम यांच्यासोबत ‘द लोकहित’ने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘प्रशासनामार्फत बालकांना पोषक आहार मिळावा, यासाठी अंगणवाडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून आहार पुरविला जातो. मात्र काही ठिकाणी बालकांना पौष्टिक आहार दिला जात नाही. उलट निकृष्ठ दर्जाचा आहार पुरवठा केला जातो. अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. शिवसेना असला प्रकार खपवून घेणार नाही. यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडीत जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.’