Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार रणांगणात उभे करण्याची तयारी केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. या दोन्ही गटांतील घटक पक्षांमध्ये कोण किती जागा लढविणार, याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान जिल्ह्यात स्थानिक पातळीवर उमेदवारीच्या दावेदारीवरून महायुती आणि आघाडीचे नेते, समर्थक आणि इच्छुक उमेदवारांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे राजकीय आघाड्यातील वातावणर चांगलेच तापले आहे.
राजकीय नेते आमने सामने
भंडारा-पवनी, साकोली लाखांदूर, तुमसर-मोहाडी या तीन विधानसभा क्षेत्रांचा भंडाऱ्यामध्ये समावेश आहे. भंडारा-पवनी क्षेत्रातून आमदार नरेंद्र भोडेंकर (अपक्ष), साकोली-लाखांदूर क्षेत्रातून आमदार नाना पटोले (काँग्रेस) व तुमसर-मोहाडी क्षेत्रातून राजू कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस) क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. राज्यातील सत्तांतर व राजकीय घडामोडीनंतर परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे वर्चस्वाच्या आणि दावेदारीच्या चढाओढीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातो, हे सांगता येणार नाही. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख नेते दररोज नवनवीन विधाने करून धाकधूक आणि उत्कंठा वाढवित आहेत.
दररोजच दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आपल्या दौऱ्यात भंडारा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये भंडाऱ्याच्या जागेवरून चढाओढ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा विधानसभेसह भंडारा जिल्ह्यातील तिन्ही जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असा दावा नुकताच केला आहे. दूसरीकडे तुमसर व भंडारा या दोन्ही जागा शरद पवार गटाला देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक नेत्यांनी केली आहे.
साकोली मतदारसंघात महाविकास आघाडीविरूद्ध उमेदवार देताना महायुतीला परीक्षा द्यावी लागणार आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा परंपरागत सामना यंदाही येथे रंगणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मतदारसंघ असल्याने येथे तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल. डॉ. परिणय फुके हे विधान परिषदेत गेल्याने भाजपमधील अनेक इच्छुकांच्या राजकीय मनीषा जागृत झाल्या आहेत. एकूण घडामोडी बघता जिल्हाचे राजकीय वातावरण तापले आहे.
Bhandara Politics : दहा हजाराचे लिफाफे, अन् ‘अपक्ष’ लढण्याची इच्छा
आजी माजी आमदार समोर
दूसरीकडे ठाकरे गटात धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटात उमेदवारीवरून आजी विरुद्ध माजी असा वाद समोर आला होता. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिल्ह्यातील काही पदांना स्थगिती देण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाद शमविण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईमुळे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही,हेही तितकेच खरे.