Akshay Shinde : बदलापूर येथील अत्याचाऱ्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. पोलीस आणि अक्षय यांच्यात झालेल्या झटापटीनंत अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे ला मारण्यात आलं यामध्ये काही तथ्य वाटत नसल्याचं उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तर काही लोकांकडून केवळ वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात आरोप- प्रत्यारोप करीत आहेत.
एनकाउंटर मध्ये मृत्यू
बदलापूर येथील अत्याचाऱ्याच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एनकाउंटर मध्ये मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे. या प्रकरणात अक्षय शिंदेला निश्चित फाशीची शिक्षा झाली असती असा दावाही त्यांनी केला आहे.
उज्वल निकम नेमकं काय म्हणाले?
उज्ज्वल निकम एका खटल्याच्या कामानिमित्त अकोल्यात आहेत. त्यावेळी अक्षय शिंदे प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात होता. आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून काही त्रुटी झाली असा आरोप आज करता येणार नसल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात काळजी घ्यायला हवी होती, असे मतही निकम यांनी व्यक्त केले. आरोपीच्या हाताला बेड्या होत्या की नाही, हे पोलीस तपासात निष्पन्न होणार असल्याचेही ते म्हणाले.
फाशी तर झालीच असती
अक्षय शिंदे यांच्या विरोधात भरपूर पुरावे होते. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झालीच असती, असा विश्वासही यावेळी उज्वल निकम यांनी व्यक्त केला. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला, असे म्हणण्यात काही तथ्य नसल्याचंही निकम म्हणाले. तर अक्षय शिंदे हा विकृत मानसिकतेचा होता आणि पोलिसांनी घटनेच्या वेळेस योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.