Road Block Movement : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन तीव्र होत आहे. अशात धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी अकोल्यात आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाजाने हे आंदोलन केले. शासनाकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. अकोल्यासह राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
आरक्षणाच्या मुद्दा तापला
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्दा चांगलाच तापला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशात धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्यभर धनगर समाजाचे आंदोलन पाहायला मिळाले. याचे पडसाद अकोल्यातही पाहायला मिळाले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा ही प्रमुख मागणी धनगर समाजाची आहे. आंदोलन करूनही राज्य सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्याने 23 सप्टेंबर रोजी राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सरकारकडे पाठपुरावा
राज्यात मराठा आरक्षणासोबतच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. अकोल्यात धनगर समाजाच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावरील रिधोराजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून धनगर आरक्षण मिळण्यासाठी धनगर बांधवांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. धनगर समाजाच्या मागणीकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ हे रस्तारोको करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी शेळी- मेंढ्यासह हे आंदोलन केले.
आश्वासन.. पण दखल नाही
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विरोधी पक्षात असताना त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होते. मात्र आता 10 वर्ष उलटूनही त्यांना दिलेल्या शब्दाचा विसर पडल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे. आंदोलनात धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. धनगर समाजाच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली. धनगर समाजाच्यावतीने मेंढरांना घेवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल होते.