Transfer Issue : भंडारा जिल्हाच्या तुमसर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) तक्रारीमुळे तुमसर शहर हद्दीत शीतयुद्ध रंगले आहे. तुमसरचे तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी आपल्या बदलीचा आदेश मनावर घेतला आहे. मेश्राम यांनी नगर विकास मंत्रालयाच्या बदलीच्या आदेशाविरुद्ध थेट न्यायालयात धाव घेतली आहे. मेश्राम यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची पुराव्यानिशी तक्रार सादर करून राष्ट्रवादीने मेश्राम यांच्या विरुद्ध मोर्चा बांधला आहे. त्यामुळे शहरात अनेक स्तरावर चर्चेला ऊत आले आहे.
एखाद्या अधिकाऱ्याची बदली. त्यानंतर त्याजागी नव्या अधिकाऱ्याची नेमणूक ही नियमित प्रशासकीय कामकाज पद्धत आहे. मात्र मेश्राम यांनी बदली रद्द करण्याचा अट्टाहास सुरू केला आहे. मंत्रालयाचे आदेशच चुकीचे मानून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तुमसर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिकाऱ्याच्या विभागीय बदलीचा वाद चांगलाच रंगला आहे.
पोलादी खुर्चा खरेदी..
तक्रार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणाले की, शहरात मिश्रधातूच्या पोलादी खुर्चा खरेदी झाल्या. शहरातील भूजली तलावाच्या कामात भ्रष्टाचार झाला. अशा अनेक विषयाला धरून शहरातील तत्कालीन तीन माजी नगराध्यक्षांच्या समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. यावरून मुख्य अधिकारी विरुद्ध राजकारणी असे द्वंद शहरात पेटले. त्यातून अनेक प्रकरणांत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागामार्फत मेश्राम यांच्या विरुद्ध चौकशीचे आदेश दिले.
न्यायालयाची दिशाभूल?
मेश्राम यांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचाही नेत्यांचा आरोप आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथे मेश्राम यांच्यातर्फे युक्तिवाद करणाऱ्या प्रतिनिधीला न्यायालयाने गुरुवारी (19 सप्टेंबर) सुनावणीत फटकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल थोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चुकीचे संदर्भ देऊन त्यांनी न्यायालयाला अंधारात ठेवले. रविवारी (22 सप्टेंबर) थोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मेश्राम यांच्याविरुद्ध माहिती दिली.
थोटेचें स्पष्टीकरण..
माजी नगराध्यक्षांनी सादर केलेल्या तक्रारीची माहिती दिली. 12 सप्टेंबरच्या चौकशी निवेदनाबाबत सांगितले. जिल्हा सहआयुक्त भंडारा यांच्या शुक्रवारी (20 सप्टेंबर) तारखेच्या चौकशी आदेशाबाबतही थोटे यांनी स्पष्टीकरण दिले. तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम तुमसर व्यतिरिक्त डीपीओ, भंडारा नगरपरिषद तथा मोहाडी नगर पंचायतीवर अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे स्वतःवर झालेल्या आरोपांची चौकशी त्यांनी थंडबस्त्यात ठेवली होती, असे थोटे म्हणाले.