Farmer Issue : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे यावर्षी पिकांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र सोयाबीनेही शेतकऱ्यांना दगा दिला. सोयाबीनला शेंगा न लागल्याने मोठं नुकसान झालं. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 22 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. गेले अनेक दिवस जिल्ह्याला त्यांची प्रतीक्षा होती. अखेर त्यांना मुहूर्त सापडला आणि ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच पोहोचले.
बऱ्याच दिवसांनंतर पालकमंत्री अकोल्यात आल्याने दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन होते. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली मागणी पालकमंत्र्यांपुढे लावून धरली. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल का असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत.
चर्चा सुरू होती..
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यात येत नाहीत, असा आरोप केला जात होता. शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. तर त्यापूर्वी काँग्रेसने ‘पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत’ अशा पद्धतीचे कॅम्पेन करणार असल्याचे सांगितले. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पालकमंत्री अकोल्यात न आल्यास आपण त्यांना आणण्यासाठी नगरला जाऊ असा इशारा दिला होता. फेब्रुवारी महीन्यापासून ते जिल्ह्यात फिरकले नसल्याचा आरोप आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाला भेटही दिली नव्हती.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यामध्येे मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा असतांना पालकमंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुलाच्या निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते. असा आरोपही विरोधकांनी केला होता. अखेर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 22 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. मात्र अनेक दिवसांनंतर पालकमंत्री जिल्ह्यात आल्याने दिवसभर वेगवेगळ्या बैठक, कार्यक्रम, पाहणी दौरा, लोकार्पण असे विविध कार्यक्रमांचे नियोजन पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात होते.
शासन शेतकऱ्यांसोबत!
सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानाच्या अनुषंगाने विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथे भेट दिली. सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवापूर येथील शेतकरी गजानन जळमकार यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानाची पाहणी केली. गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
MLA Nitin Deshmukh : देशमुखांचा इशारा ठरला परिणामकारक, विखे पाटील येणार !
शेतकरी म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करा!
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवरील संकट थांबता थांबेना अशी परिस्थिती आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र पिकाला शेंगाच लागल्या नाही. या पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. बहुतांश भागात कपाशीचे पीक एक-दीड फुटा पर्यंतच वाढले आहे. काही ठिकाणी पीक चांगले आहे; मात्र त्याला बोंडेच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसाळ्यात पावसाचे दिवस अधिक असल्याने पिकांवर रोगराई वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. सप्टेंबर महिना अर्धा संपूनही पाऊस सुरूच असल्याने ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.