Assembly Election : महाराष्ट्रात निवडणूक वेळेवर व्हाव्या, ही सगळ्यांची मागणी आहे. महाराष्ट्रात जर भाजपला निवडणुका नको असतील, तर ते दंगली घडवतील. राज्यपालांमार्फत अहवाल देतील आणि महाराष्ट्र अस्थिर आहे म्हणून निवडणुका पुढे ढकला, असंही सांगतील. पराभव पुढे दिसत असल्याने हा रडीचा डाव खेळला जातो आहे, असा हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
लाडकी बहीण योजना
नागपुरात रविवारी (ता. 22) वडेट्टीवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना आणूनसुद्धा त्यांना पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते कुठलेही डाव खेळू शकतात. जेवढ्या ते निवडणुका लांबणीवर टाकतील, तेवढी महाविकास आघाडी भक्कम होईल. आमची संख्या अधिकाधिक वाढेल, असा दावा त्यांनी केला.
जाहीर करणे चुकीचे
कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर करणे चुकीचे आहे. शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. कारण जेव्हा तिन्ही पक्षांचा निर्णय होईल. तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजे. आम्ही चारही राज्य जिंकू, तेव्हा नरेंद्र मोदींच्या खुर्चीचे दोन पाय निखळलेले दिसतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. खडसेंबाबतच्या बातम्या येतात आणि जे स्वतःही ते म्हणतात, त्यावर त्यांनी पडदा टाकावा. त्यांनी एकदा ते स्पष्ट करून टाकावं की कुठे आहेत आणि कुठे जाणार आहेत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढेल, असंही ते म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. याबाबत विचारले असता, दावा करणे आणि आघाडीत चर्चेतून निर्णय घेणे, हे वेगळं आहे. एखादा पक्ष दावा करेल, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र बैठकीत जो निर्णय होईल, तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून निर्णय घेतील. तेव्हाच ठरेल की कोणती जागा कोणाला द्यायची आणि कोणाला नाही. सहाही जागांवर दावा केला म्हणून सर्व जागा आमच्या आहेत, असं नाही. मुंबईत 36 जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. म्हणून त्या 36 जागा ते लढतीलच, असंही काही नाही.
काँग्रेस मजबूत
विदर्भात काँग्रेस मजबूत आहे. इतर दोन्ही पक्षांच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. त्या दोन पक्षांच्या तुलनेत आम्ही मजबूत असल्याने अधिकाधिक जागा काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल. महाविकास आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाहीत. कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल.
यश येईल
विदर्भात काँग्रेसला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आम्ही मित्र पक्षांना सांगितलं आहे. सहकार्य करण्याची विनंती केली आहे. काँग्रेसने किमान 45 जागा लढाव्या, असा सगळ्यांचा सूर आहे. 50 जागांपर्यंत लढलो तरी आम्हाला चांगलं होईल. इतर भागांतील जागा त्यांनी जास्त घ्याव्या, विदर्भात आम्हाला झुकते माप द्यावे, अशी मित्रपक्षांना आमची विनंती असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.