या लेखातील मते लेखकाची आहेत या मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही
Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. निवडणूक लवकरच होणार असल्याने राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेली महाविकास आघाडी हे दोघेही प्रतिस्पर्धी जागा वाटपाच्या दृष्टीने विचारमंथन करत आहेत. चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण किती जागा लढविणार, याबाबतीत अजून तरी काही निश्चित ठरलेले नाही. जागा वाटप करताना दोन्ही बाजुंनी तारेवरची कसरत होणार आहे.
प्रत्येक गोष्टीचा सामना..
जागा वाटपावर एकमत होईपर्यंत नाराजी, रुसवे फुगवे , दबावतंत्र, बंडखोरी या बाबींचा सामना करावा लागणार आहे. प्रत्येक पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण वरचढ रहावे, अशी अहमहमिका सुरू आहे.
जागा वाटपाचा प्राथमिक टप्पा पूर्ण होण्याच्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून सत्ता काबीज करण्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी नावे समोर येत आहेत.
राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी अशी अनेकांची इच्छा आहे. अजित पवार यांनी तर आपल्या मनातील भावना स्पष्टपणे बोलूनही दाखविली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी हाकाटी पिटत उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यांचे नांव याआधीच समोर केले आहे.
Indurikar Maharaj : पुढाऱ्यांची किंवा उद्योगपत्यांची मुलं सैन्यामध्ये नाहीत !
पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा..
सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आहेत. आपण पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे त्यांना वाटते. जनतेच्या मनात भक्कम स्थान मिळविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह अनेक कल्याणकारी योजना आपणच सुरू केल्याचे जनतेच्या मनात बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न शासकीय जाहिरातींमधून बघायला मिळतो. महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास पुन्हा तेच मुख्यमंत्री होतील, याची मात्र खात्री नाही.
देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा आग्रह..
2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर राज्यात बरेच महाभारत घडले. मविआ सरकारला मध्येच सत्ता सोडावी लागली. फोडाफोडी आणि जोडतोडनंतर हा अभिनव खेळ खेळला गेला. महायुती पुन्हा सत्तेत आली. अभिनव साथ देणा-या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. दुस-यांदा मुख्यमंत्री होण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंगले.
आता मात्र त्यांचे समर्थक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी करत आहेत. भाजपचे नेते गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले. वेगळी रंगसंगती वापरून आपले राजकीय भवितव्य फुलवण्यासाठी अजितदादा जोरदार प्रयत्न करत आहेत.मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे जुने स्वप्न आहे. जनतेच्या मनातील रंगसंगतीचा वेध घेण्यात मात्र ते फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. आपले नेमके चुकले कुठे, यांचा ते अंतर्मुख होऊन विचार करत आहेत.
मविआतील पहिला डमरू..
राज्यात मविआचे सरकार सत्तारूढ होणार आणि जनतेच्या मनातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, असा डमरू उद्धव ठाकरे समर्थकांकडून सर्वप्रथम वाजवला गेला. प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांचे नाव सातत्याने चर्चेत ठेवले.त्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दुर्लक्ष केले. ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे धोरण ठरले. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत संपर्क साधून आपले नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करण्याचा प्रयत्न केला. या भेटीवर चौफेर टीका झाली. आता उद्धव ठाकरे यांचे नाव या पदाच्या शर्यतीत खूप मागे पडले आहे.
काँग्रेसही मागे नाही..
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल, असे विधान या पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली. या विधानावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. बाळासाहेबांचे विधान संजय राऊत यांनी गांभीर्याने घेतले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्याग केला. काही हमखास निवडून येणा-या जागा शिवसेनेने काँग्रेसला दिल्या. या विजयात आपल्या गटाचे योगदान मोलाचे आहे, असे शिवसेनेने आवर्जून नमूद केले. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे प्राधान्याने पुढे आहेत. नाना पटोले यांची तर मुख्यमंत्री व्हायची तीव्र इच्छा आहे.
महिला मुख्यमंत्री व्हाव्यात..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद महिलेला मिळावे, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाचा या पदासाठी त्यांनी उल्लेख केला.विधानसभा निवडणुकांचे जागा वाटप सहमतीने होईल, असे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागांची मागणी भारतीय जनता पक्षाची राहणार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येतात? मिळणा-या जागांवर ते समाधानी राहतील का, हेही बघावे लागणार आहे. त्यातून नाराजीचा सूर उमटू शकतो. मतदारस़घातील घटक पक्षांचे प्राबल्य लक्षात घेवून जागा निश्चित कराव्या लागणार आहेत. चुकीचे फेरबदल केल्यास जागा गमावण्याची वेळ येऊ शकते.
काँग्रेस मोठा भाऊ..
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सरस राहिली. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ ठरला. महाविकास आघाडीत जागा वाटपावर लवकर सहमती होईल, असे दिसत नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात काही मतदारसंघांत जागा वाटपाबाबत संघर्षाची स्थिती उद्भवू शकते.
एकंदरीत राज्यात निवडणुकांचा माहोल तयार होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या प्रतिस्पर्ध्यांत आता तिसऱ्या आघाडीचा प्रवेश झाला आहे. कोणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही. स्वप्नं रंगवली जात आहेत. अजून काहीच निश्चित नाही. तरीही थेट मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. सामान्य जनतेचे वेगळे मनोरंजन होत आहे.