Akola : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोला दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. विरोधकांकडून विखे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नसतील तर त्यांना नगरवरून उचलून आणू, असा इशारा दिला होता.
दिला होता कडक इशारा
आमदार नितीन देशमुख यांच्या इशाऱ्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या (ता. 22) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विखे पाटील अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या समारोपीय कार्यक्रमाला येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात न येण्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. तेव्हापासून पालकमंत्री एखादा अपवाद वगळता जिल्ह्यात आलेच नाहीत. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्यावर आरोप करीत गंभीर इशारा दिला होता.
14 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन आमदार देशमुख यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शेकडो शिवसेना आणि शेतकऱ्यांना घेऊन नगर येथे जाणार असल्याचा इशारा दिला होता. 23 सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री विखे पाटील हे जिल्ह्यात आले नाहीत. जर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. तर 24 सप्टेंबर रोजी आपण त्यांना घ्यायला नगर येथे जाऊ. त्यांना पालखीत बसवून जिल्ह्यात आणणार असल्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला होता. जर त्यांनी येण्यास नकार दिला तर आपण त्या ठिकाणीच आंदोलन करू, असेही देशमुखांनी सांगितले होते.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अकोल्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असल्याने त्यांना अकोल्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. यापूर्वी पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. त्यामुळे नागपूर येथून चालत असलेला अकोला जिल्ह्याचा कारभार नंतर नगरमधून चालायला लागला होता.
राधाकृष्ण विखे पाटील हे काही अपवाद वगळता अकोल्यात आलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तर शिवसेना ठाकरे गटाकडून हा मुद्दा उचलण्यात आला. निवडणुकीपूर्वी विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात आले.
अखेर पालकमंत्री अकोल्यात..
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 22) विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 10 वाजता अकोला विमानतळावर आगमन. सकाळी 10.20 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आगमन. 11 वाजता शिवारफेरी व थेट पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 1.15 वाजता बेघर निवारा व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाला उपस्थिती.
दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी, पीकविमा, पीक कर्ज आदींबाबत आढावा बैठक, दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, युवा कौशल्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा, वयोश्री, तीर्थदर्शन, बळीराजा सवलत व इतर योजनांचा आढावा, सायंकाळी 5 वाजता विविध शासकीय विभागांचा आढावा. सोयीनुसार शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता अकोला विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता विमानाने मुंबईडे प्रयाण, असा त्यांचा कार्यक्रम आहे.
आता ठाकरे गटाची भूमिका काय?
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 23 सप्टेंबरपूर्वी अकोल्यात न आल्यास आपण 24 सप्टेंबरला नगर येथे जाऊ आणि त्यांना पालखीत बसून अकोल्यात घेऊन येऊ असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला होता. आता पालकमंत्री विखे पाटील हे अकोल्यात येणार आहेत. त्यामुळे आमदार नितीन देशमुख उद्याच्या पालकमंत्री दौऱ्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे.