Gondia : आमदाराची खुशामती करणे गोंदियाच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला चांगलेच भोवले. आमदारांच्या पत्रावरून सकाळ पाळीत शाळा ठेवणाऱ्या आमगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी निलंबनाची कारवाई केली. तर सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे.
काँग्रेसचा सवाल
असाच प्रकार तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातसुद्धा घडला आहे. तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर याच नियमाने कारवाई का नाही, असा सवाल काँग्रेसचे आमदार सहषराम कोरोटे यांनी उपस्थित केला आहे. राजकीय सूडभावनेतून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. यावरून आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
शिक्षक दिन, शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम आमगाव, सालेकसा, गोरेगाव, तिरोडा तालुक्यात पार पडला. या कार्यक्रमासाठी सकाळ पाळीत शाळा ठेवण्यात यावी, असे पत्र आमदाराने आमगाव व सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या पत्राचा आधार घेत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा सकाळ पाळीत ठेवली.
या प्रकाराला राजकीय वळण आले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम एम. यांनी शिस्तभंग केल्याचे पत्र देत आमगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तर सालेकसा गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती आहे.
अधिकार नाही
गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार नाहीत. तसेच त्यांनी यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. नियमानुसार सीईओंनी कारवाई केली. यात काही गैर नाही. पण आमगाव आणि सालेकसा तालुक्याप्रमाणेच तिरोडा आणि गोरेगाव येथेसुद्धा असाच प्रकार घडला. मग तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकाला मायचा, दुसऱ्याला मावशीचा न्याय कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असले तरी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनावरून विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणाकोणावर शेकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Youth Congress : आमदार गायकवाडांच्या विरोधातील आंदोलनात तणाव
अॅक्टीव झाले..
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आमदार आणि निवडणुकीसाठी इच्छुक लोक चांगलेच अॅक्टीव झाले आहेत. आपण काहीतरी करतोय, हे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या नादात आमदारांना गटशिक्षणाधिकाऱ्याचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे. आमदारांनी सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. पण गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही कळायला पाहिजे की, त्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत. केवळ आमदारांचे आदेश पाळल्यामुळे एका अधिकाऱ्याला घरी जावे लागले. इतर अधिकाऱ्यांनी तरी या घटनेतून बोध घेतला पाहिजे.