ठाकरेंच्या शिवसेनेचा गट भंडारा विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. भंडाऱ्यात आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. आपल्या जिंकलेला जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
किशोरी पेडणेकर यांच्या दाव्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये भंडाऱ्याच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा विधानसभेसह भंडारा जिल्ह्यातील तीन्ही जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असा दावा नुकताच केला आहे. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो. नाना पटोले काहीही बोलले असले तरी, ते एका पक्षाचे मुख्य पदाधिकारी आहेत. ते त्यांचं मतं असू शकतं.
ज्या जागेवर आमचा शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे, ती जागा आम्ही 99% सोडणार नाही, असं आमच्या पक्ष प्रमुखाचं धोरण आहे. शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांचे मत आणि मन सांभाळण्याचं काम नक्की करतील. मात्र भंडारा विधानसभा ही आमची हक्काची जागा आहे. ती आम्ही सोडणार नसल्याचं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
शिंदेच्या आमदाराची हवा टाईट
आम्ही भंडाऱ्याच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत. तो मेसेज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना देणार आहे. इथल्या आमदाराची काय परिस्थिती झाली, ते आधीच समजुन येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या आमदाराच्या तोंडावर दरवाजा बंद केला. नियती आपलं काम करतेय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकादिलानं लढेल आणि गद्दारांना घरी पाठवेल. तीन पैकी एक विधानसभा आम्ही लढणार. ही इथल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यामुळे ही जागा आम्ही सोडणार नाही, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघाबाबत केला.
Mahavikas Aghadi : आता एजन्सी करणार महाविकास आघाडीच्या जागा वाटप?
भाजप फुसके धक्के
पुढारी कितीही बेइमानी करो, मतदार मात्र हलत नाहीत. यावेळी मतदारसुद्धा मशालीवरच मतदान करेल, याची नक्की खात्री आहे. खिचातानी तर झालीच पाहिजे, त्यावरच पक्षाची ताकद कळेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेससह सर्व पक्षांना धक्के देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत बघितलं, मतदार हलला नाही. नांदेडमध्येसुद्धा काँग्रेसनं भाजपाला धक्का दिला. त्यामुळे भाजपचे धक्के फुसके ठरल्याचा टोला पेडणेकर यांनी लगावला.