महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : आता एजन्सी करणार महाविकास आघाडीच्या जागा वाटप?

Vidarbha : विदर्भातील जागांवर पुढील बैठकीत चर्चा

Assembly Elections : महाविकास आघाडीचा जागांचा फार्मूला ठरला आहे. 60 टक्के जागा वाटपावर आपसी सहमती झाली असल्याची खात्रीशीर माहिती ‘द लोकहित’च्या हाती लागली आहे. दरम्यान वादाच्या 40 टक्के जागांबाबत अद्याप तिढा आहे. या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे, हे जाणून घेतले जाणार आहे.

एजंसीने दिलेल्या माहितीनंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एजन्सी महाविकास आघाडीच्या तिढा असलेल्या जागा वाटप करणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये जागा वाटपाचा फार्मूला ठरला आहे.

288 जागांपैकी 100 जागा काँग्रेस लढवेल, 100 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवेल तर 84 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढवेल, असे सूत्र सांगतात. तर उर्वरित 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. यात पहिल्या बैठकीत विदर्भ वगळता मुंबई -कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागांतील विधानसभा मतदारसंघांतील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पार पडली आहे.

2019 साली जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीचं ठरलंय. तीन्ही पक्षाच 60 टक्के जागांवर एकमत असल्याची माहिती आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे. पुढील बैठकीत ही अडचणही सोडवली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

एजन्सीचे ‘हे’ काम

विशेष म्हणजे तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्या मतदारसंघांत कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे, हे ही एजन्सी जाणून घेणार आहे. ही जमा केलेली माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार आहे.

विदर्भावर असहमती

दरम्यान विदर्भाबाबत अद्यापही आघाडीच्या नेत्यांत आपसी सहमती झाली नाही. असे असले तरी विदर्भातील जागांवर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. त्या संदर्भातसुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल. लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. मात्र विदर्भाच्या या जागाबाबत ‘एजन्सी’ची मदत महत्वाची ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!