General Hospital : अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच सर्वोपचार रुग्णालय पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी वरदान ठरत आहे. मात्र या रुग्णालयात रुग्णांकडून खासगी रुग्णालयांप्रमाणे दर आकारणी होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या विरोधात 20 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य झाली नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
समाजातील शेवटच्या घटकाला योग्य आणि मोफत उपचार मिळावे, याकरिता जिल्हा स्तरावर सामान्य रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली. सरकारी रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक नियमित उपचार घ्यायला येतात. मात्र याच रुग्णालयात म्हणजेच सर्वोपचार रूग्णालयात (मेन हॉस्पिटल) सर्वसामान्य रुग्णांकडुन विविध तपासण्या व शस्त्रक्रियेसाठी शुल्क आकारण्यात येत आहे. जनतेची लुट केली जात आहे, असा आरोप आता वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. ही लुट थांबवून शासनाने इतर जिल्ह्यांतील शासकीय रूग्णालयांप्रमाणे अकोला सर्वोपचार रूग्णालयातील उपचार पूर्णपणे निःशुल्क करावे. या प्रमुख मागणीसाठी 20 सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे.
या आहेत मागण्या!
एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे रक्त-लघवी तपासणी निःशुल्क करावे. ऑपरेशन झाल्यावर वॉर्डचे दर निशुल्क करण्यात यावे. सोनोग्राफी 200 रुपये आहे ती निशुल्क करण्यात यावी. सर्वोपचार रूग्णालयात खासगी रुग्णालयासारखे लावण्यात येणारे दर काढून टाकावे आणि निःशुल्क करावे. औषधांचा स्टॉक पूर्ण उपलब्ध नाही. तो उपलब्ध व्हावा. इत्यादी मागण्या वंचितकडून आंदोलनादरम्यान लावून धरण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, जि. प. अध्यक्ष संगीता अढावू महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा जि. प. समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Youth Congress : आमदार गायकवाडांच्या विरोधातील आंदोलनात तणाव
मागण्या मान्य न झाल्यास..
वंचित बहुजन आघाडीकडून सर्वोपचार रुग्णालयाविरोधात आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. तर मागण्या मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. परिणामी होणाऱ्या नुकसानास शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.