Tumsar-Mohadi : राजकारणातील भीष्म म्हणून ओळख असलेले माजी आमदार चरण वाघमारे आणि लोकनेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची छुपी मैत्री ‘उघड’ आहे. वाघमारे यांनी निवडणुकीमध्ये मदत करत नानांची प्रतिष्ठा कायम ठेवली. ही बाब लक्षात घेता आता नाना पटोलेंना चरण वाघमारे यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याची वेळ आली आहे. चरण वाघमारे पुन्हा एकदा तुमसर-मोहाडी विधानसभेच्या निवडणुकीत दम ठोकून बसले आहेत. त्यांना मदत करून परतफेड करण्याची नानांची वेळ आहे, असे वाघमारे समर्थक बोलू लागले आहे.
ताकदीने मदत दिलीच
या भीष्माने भंडारा जिल्हा परिषदेची अटीतटीची निवडणूक असो की लोकसभेची प्रतिष्ठेची निवडणूक असो लोकनेत्याला पूर्ण ताकदीने मदत केली. पटोलेंनीही वाघमारेंना त्यांच्या राजकीय अडचणीच्या वेळी धीर दिला आहे. मात्र आता खऱ्या अर्थाने या पटोलेंनी वाघमारे यांना मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे लोकनेते नाना पटोले हेही “यारो के यार” म्हणून ओळखले जातात. तेही आपल्या मैत्रीला जपणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे भविष्यात छुप्या पद्धतीने का होईना नाना पटोले नक्कीच चरण वाघमारे यांना मदत करतील, अशी दाट शक्यता आहे.
नानांना पडू शकते वाघमारेंची गरज
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुन्हा एकदा माजी आमदार चरण वाघमारे यांची गरज पडू शकते. चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशनचे एकट्या भंडारा जिल्ह्यात 50 हजाराहून अधिक अधिकृत सदस्य आहेत. नानांच्या विधानसभा मतदारसंघात विकास फाउंडेशनमध्ये 18 हजार सदस्य नोंदणी झाली आहे. भाजपची खेळी लक्षात घेता नानांना ही मते आपल्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे भंडारा विधानसभा मतदारसंघात चरण वाघमारे यांना दुर्लक्षित करून भंडारा विधानसभा जिंकण्याचा विचारच करू शकत नाही. एकट्या भंडारा तालुक्यात 12 हजार अधिकृत सदस्यांची नोंद आहे. हे सर्व आकडे लक्षात घेता नानांना वाघमारे यांची गरज आगामी विधानसभेतही पडणार यात शंका नाही. त्यामुळे वेळीच नाना पटोले यांनी चरण वाघमारे यांची असलेली मैत्री दृढ करण्याची गरज आहे.