BJP on Congress : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी अमेरिकेतील एका कार्यक्रमात म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत,’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
विरोधकांवर टीका..
गुरुवारी बुलढाणा शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांच्या लोकार्पण कार्यक्रमासह महिला सशक्तीकरण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्री व आमदारांची उपस्थिती होती. शारदा ज्ञानपीठ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचारार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच इतर महापुरुष व संतांच्या पुतळ्यांचे ई-अनावरण झाले. एकनाथ शिंदे यांनी भाषणातून काँग्रेससह विरोधकांना आडव्या हाताने घेतले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आला आहे. विदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे आणि बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.’
‘आरक्षण संपवण्याचे मनसुबे राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केले. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षण संपवू देणार नाही,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रत्येक प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असंही त्यांनी सांगितलं.
राहुल यांच्या घरापुढे आंदोलन करा
विरोधकांनी लोकसभेत लोकांना फसवून मतं घेतली. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अशा खोट्या अफवा पसरवल्या. देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. आणि म्हणून ‘जब तक सुरज चांद रहेगा, संविधान कायम बना रहेगा. बाबासाहेब तेरा नाम रहेगा,’ असेही शिंदे म्हणाले. काँग्रेसचे लोक आंदोलन करत आहेत. खरंतर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे. आरक्षण रद्द करण्याची भाषा आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकार रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असा सवालही त्यांनी केला.
तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कारण नेहरूनपासून सगळ्यांनी अनेक वेळा क्षण रद्द करण्याची भाषा केली आहे. आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचा आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना कायम सुरु राहणार. आणि त्यात 3 हजारापर्यंत वाढ होणार, असे आश्वासन महिलांना दिले.
साथ द्या, योजना बंद पडणार नाही
आम्ही वचन पाळणारी लोकं आहोत. आम्ही दिशाभूल करणारे सरकार नाही. अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आता या योजनेत जवळपास 1 कोटी 60 लाख बहिणी लाभार्थी झाल्या आहेत. अजून पुढचे टप्पेही लवकरच होणार आहेत. ज्यांचे अर्ज राहिले आहेत, त्यांनी अजूनही अर्ज करावे. आम्ही तो लाभ त्यांना देऊ. मात्र विरोधक या महत्त्वाकांक्षी योजनेची टिंगल टवाळी करत होते. योजनेवर शंका व्यक्त करत होते. हे विरोधक एवढे वर्ष सत्तेत होते. तेव्हा महिलांना मदत का केली नाही? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. मात्र तुम्ही फक्त महायुतीला साथ द्या, कोणतीही योजना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेन्द्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला आहे.