Bihar Cadre : मूळचे विदर्भाचे आणि बिहामध्ये सेवेत असलेले ‘सिंघम’ आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून अचानक एक्झिट घेतली आहे. अकोला येथील पारसचे रहिवासी शिवदीप लांडे बिहार केडर मधील आयपीएस पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी गुरुवारी पोलीससेवेचा राजीनामा दिला आहे. 18 वर्षांच्या पोलीस दलातील सेवेदरम्यान शिवदीप लांडे सिंघम म्हणून ओळखले जातात. त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे.
‘माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीही चुकभूल झाली असेल तर त्यासाठी क्षमस्व. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल,’ असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
काय म्हणाले सिंघम?
‘माझे प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीही चुकभूल झाली असेल तर त्यासाठी क्षमस्व. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल,’ असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
नितीश कुमार नाराज झाले होते
शिवदीप लांडे हे मध्यंतरी मुंबईत महाराष्ट्र पोलीस सेवेतही कार्यरत होते. लांडे हे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी केली होती. ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले होते. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. शिवदीप लांडे यांची काही काळासाठी महाराष्ट्रात बदली झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लांडे यांना सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र, सिंघम शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजे महाराष्ट्रात परतायचे असल्याने त्यांना मुभा देण्यात आली होती.
2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
40 वर्षीय शिवदीप लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शिवदीप यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी घेतली आहे. 29 ऑगस्ट 1976 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बडसिंगी इथे शिवदीप यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. शिवदीप यांना एक मोठी बहिण आणि लहान भाऊ आहे. शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यूपीएससीमध्ये पास झालेल्या शिवदीप लांडे यांना कलेक्टर बनण्याची इच्छा होती. पण रँक न मिळल्याने त्यांना आयपीएस स्वीकारावं लागलं.