Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आता आता तिसऱ्या आघाडीची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये कोण असणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशात नव्या समीकरणात मनोज जरांगे पाटील आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश असेल, असे बोलले जात आहे.
लक्ष लागले
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील माहिती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. गुरुवारी (19 सप्टेंबर) पुण्यात यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अद्याप आचारसंहिता लागू झालेली नाही. निवडणुकीच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत. पण दिवाळीनंतर निवडणूक होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. तिसरी आघाडी राज्यात स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. तिसऱ्या आघाडीच्या वारंवार बैठका होत आहेत. 19 सप्टेंबर रोजीही पुण्यात महत्त्वाची बैठक होत आहे.
महत्त्वाचा निर्णय
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह बच्चू कडू आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यात ही बैठक होत आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीत इतरही काही नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील तिसऱ्या आघाडीत समावेश करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यासाठी समान कार्यक्रम आखण्याची तयारी देखील राजू शेट्टी यांनी दर्शवली आहे.
Sanjay Gaikwad : काँग्रेसच्या कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर गाडून टाकेल
लोकसभा निवडणुकीत ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव दिसला नाही. तरीही विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे मनोज जरांगे पाटील देखील तिसऱ्या आघाडीत सामील होतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.