Scheduled Caste Tribes : पहिले लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल असे वाटले. पण लोकसभेने हुलकावणी दिली. त्यानंतरही राजकीय पुनर्वसन होईल अशी चर्चा सुरू होतीच. अशात राज्यपालपद मिळणार असल्याचा दावा ते स्वतःच करतात. पण याही पदाने हुलकावणी दिली. आणि अखेर आता पदरी पडले ते महामंडळ. ही कहाणी आहे आनंदराव अडसूळ यांची. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांची अखेर अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार आणि राज्यपालपदाची आस लावून बसलेले अडसूळ यांना महामंडळावर समाधान मानावे लागणार आहे.
निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा हवेत विरल्या आहेत. पण अडसूळ यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ मिळाले आहे. त्यामुळे थोडक्यात निभावून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एकंदरीतच ज्या नेत्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. त्यांना, आता महामंडळ देऊन शांत केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.
उघडपणे नाराजी व्यक्त
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीतील नेत्यांकडून अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. अमरावतीचे माजी खासदार शिवसेना शिंदे गटाचे नेते अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर अडसूळ यांनी दावा केला होता. त्यांना डावलून येथे भाजपचा उमेदवार उभा करण्यात आला. यावेळी अडसूळ यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपालपदाचे आश्वासन दिले असल्याचा दावा केला. तर, त्यांचे पूत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी देखील त्याला दुजोरा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदराव अडसूळ यांचे नाव राज्यपाल पदासाठी पाठवल्याची माहिती त्यांनी दिली होती.
अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केली खंत
केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याची खंतही अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केली होती. आनंदराव अडसूळ यांच्यासोबत योग्य न्याय न झाल्यास पंधरा दिवसात आपण वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची अडसूळ यांनी भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपालपदाची आस असलेल्या अडसूळ यांची अखेर महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ही त्यांची राजकीय बोळवण असल्याचे आता बोलले जात आहे.
अध्यक्षपदी नियुक्ती
शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्या महामंडळांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाने तसा आदेश जारी केला आहे. त्यामुळे राज्यपाल पद मिळणार असल्याच्या दाव्याला अखेर पूर्ण विराम मिळाला का, अशी चर्चाही सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे पूत्र असलेले कॅप्टन अभिजित अडसूळ यांना दर्यापूर विधानसभेची उमेदवारी तरी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.