Sanjay Gaikwad Controversy : आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी पोलीस स्टेशन मध्ये सहा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. गायकवाडांविरोधात गुन्हे दाखल झाले आणि आंदोलनाला यश आले. मात्र या आंदोलनाची शिक्षाही काँग्रेसला भोगावी लागली. काँग्रेसचे दोन आमदार आणि नेते कुणाल चौधरी यांच्यासह ९२ जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नियमाचे उल्लंघन
जिल्हाधिकार्यांच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांसह इतर काँग्रेस पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. त्याचा देशभरात कडाडून विरोध झाला. त्याचा निषेधही नोंदविण्यात आला. त्यानंतर बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठ वादग्रस्त विधान केलं होत. राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान करत त्यांनी 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.
या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते अचानक सोमवारी सायंकाळी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात आंदोलन केले. त्याचप्रमाणे ठाणेदार यांच्या दालनामध्ये राहुल गांधी जिंदाबाद, संजय गायकवाड मुर्दाबाद, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है, होश मे आव होश मे आव, पोलीस प्रशासन होश मे आव अशी नारेबाजी केली. घोषणाबाजी करून पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला आणि रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.
जमावबंदी लागू
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशवरून, 9 ते 23 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही 16 सप्टेंबरला काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनमानी केली. कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता व प्रशासनाची कोणत्याही प्रकारची पुर्वपरवानगी न घेता पोलीस स्टेशनमध्ये एकत्र आले. एकत्र येवून घोषणाबाजी करुन ठाणेदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
Congress Agitation : यावेळी आमदार गायकवाडांना भारी पडणार आगाऊपणा !
गुन्हे दाखल
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी, आमदार धिरज लिंगाडे, आमदार राजेश एकडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके, सुनिल सपकाळ, संजय पांढरे, दत्ता काकस, मीनल आंबेकर, स्वाती वाकेकर, मंगला पाटील, हरीश रावळ, भगवान धांडे, गजानन मामुलकर, भूषण मापारी, साहेबराव पाटील, रिजवान सौदागर, अनिल सावजी, रामभाऊ जाधव, डॉ.अरविंद कोलते, अतुल शिरसाट, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, समाधान पुंडलिक दामधर, विजय अंभोरे, अॅड.संजय राठोड, मोहम्मद आसिफ इकबाल तफझुल हुसेन, एकनाथ चव्हाण, आश्विन जाधव, डॉ.ईसरार अहमद, शेख मोहसिन शेख अन्सार व इतर 50 ते 60 कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.