Unveiling of statues : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय बुलढाणा शहरात इतर महामानवांच्या पुतळांचे अनावरण देखील होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ 19 सप्टेंबरला बुलढाण्यात येत असल्याचे सत्तेतील त्रिकुटाने म्हटले आहे. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तयारीला लागले आहे. त्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आढावा देखील घेतला.
26 महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला आहे. या शिवस्मारकासह शहरातीत 26 महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणार आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आदींची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील विश्रामगृहावर सोमवार 16 सप्टेंबरला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी 19 सप्टेंबरच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमस्थळाची पाहणी करण्यात आली. हा कार्यक्रम शारदा ज्ञानपीठ येथील मैदानावर होणार आहे.
यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, प्रा बळीराम मापारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मान्टे, सचिन देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काजी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनुजा सावळे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माया म्हस्के यांच्यासह युतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गर्दी खेचून आणण्यासाठी प्रयत्न
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे हा या या बैठकीचा प्रमुख उद्देश होता. त्यासाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिलांचीही गर्दी राहील यासाठी प्रयत्न केले जात आहे.
नागपूरनंतर बुलढाण्याकडे मोर्चा
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री गेल्या महिन्यात लाडकी बहीण कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात होते. या योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे पैसे देण्यासाठी हा कार्यक्रम होता. यावेळी तिघांनीही एकप्रकारे प्रचारालाच सुरुवात केली होती. नागपूरमधून रणशिंग फुंकल्यानंतर आता बुलढाण्याकडे त्यांनी मोर्चा वळवला आहे.