Objectionable Statements : बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असे वक्तव्य केले. त्यामुळे काँगेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता काँग्रेसने केली आहे. यासाठी सोमवारी (ता. 16) काँग्रेसकडून शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांचे वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
वादग्रस्त विधान
राहुल गांधी देशात आरक्षण संपण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या खरा चेहरा लोकांच्या समोर आला आहे. मराठा समाज 50 वर्षांपासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच आता आरक्षण संपविणार आहे, असं राहुल सांगतात. आरक्षण संपविण्याची भाषा राहुल करीत आहेत. मागासवर्गीय आरक्षण तुम्ही संपविणार, असे म्हणत आमदार गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे. गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचा संताप
सोमवारी सकाळी आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींबाबत खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले की, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांच्या जे पोटात होते, ते बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना आरक्षण दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे आरक्षण रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून केला गेला. काँग्रेसने निवडणुकीत मतं मागितली. आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.
अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. राहुल यांची जीभ जो कापेल त्याला 11 लाख रुपये देणार, असे गायकवाड म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर बुलढाण्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली. राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या आमदार गायकवाडचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
Sanjay Gaikwad : राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस
राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी
काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका आमदाराने राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तक्रार दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.