Department of Women Child Welfare : नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागात 30 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या तीन सदस्यीय समितीने चौकशी करावी, असा आदेश शासनाने दिला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेले बालविकास अधिकारी सध्या पसार आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गज्जू यादव यांची तक्रार
भ्रष्टाचाराची सुई आता जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांच्याकडे वळली आहे. भाजपाचे जिल्हा महामंत्री उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण विभागात अंगणवाडी साहित्य खरेदी/पुरवठा, पोषक आहार पुरवठा, निविदा प्रक्रियेतील अनियमितता झाली होती.
या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 13 तालुक्यांतील प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांवर दबाव टाकून संगनमताने कोणत्याही प्रकारची निविदा न करता एकाच कंत्राटदाराला काम दिले. यासाठी अध्यक्षांचे स्विय सहायक जगदीश कालदाते यांचा फोन आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. नियमानुसार एक कोटी पेक्षा अधिक रुपये किमतीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता घेण्याची आवश्यकता होती.
सत्ताधाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून एकाच कंत्राटदाराकडून साहित्य खरेदी करण्याचा घाट घातला. या प्रकरणाची गज्जू यादव यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत ग्रामविकास मंत्रालयाने आदेश जारी करत अंगणवाडी साहित्य खरेदी व पोषण आहार पुरवठा यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश नागपूरच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करावा व चौकशी अहवाल 30 दिवसांत शासनाकडे सादर करावा, अशा सूचना केल्या आहेत.
मोठा भ्रष्टाचार
जिल्हा परिषदेत हा केवळ एकच घोटाळा नाही. तर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, शिक्षण विभागासह, महिला बालविकास विभागाअंतर्गत अनुसूचित जाती उपायोजना व आदिवासी उपायोजना अंतर्गत महिलांना व मुलींना तांत्रिक शिक्षण देणे, शिवणकाम प्रशिक्षण देणे, अंगणवाड्यांना प्रेशर कुकर वाटप, सॅनिटरी नॅपकिन पुरवणे, अंगणवाडी ना खेळणी साहित्य पुरवणे, बास्केटबॉल पुरवणे, बेबी कीट केयर साहित्य पुरवणे, पंधरावा वित्त आयोगातील बाधित निधी, पंतप्रधान खनिज निधी या अंतर्गत देखील साहित्य खरेदी व पुरवठा यामध्येही मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे गज्जू यादव यांनी म्हटले आहे.
Nitin Gadkari : गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती का? सुप्रिया सुळे म्हणाल्या..
कठोर कारवाई
विशेष म्हणजे या संपूर्ण भ्रष्टाचार महिला व बालकल्याण विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नजरेआडून कसा होत होता, हे समजण्यापलीकडे आहे. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांची भूमिका तपासून पाहणे आवश्यक असल्याचेही उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी म्हटले आहे.