Health Science Studies : आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण प्रवेश घेण्यासाठी डिमांड ड्राफ्टनेच पैसे भरणे अनिवार्य आहे. पण सुट्यांमुळे बँका बंद आहेत. अशात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डिमांड ड्राफ्टऐवजी चेकने (धनादेश) शुल्क स्वीकारले जावे, अशी सूचना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ही सूचना तत्काळ मान्य करीत सीईटी विभागाने या संदर्भाचे पत्रकच निर्गमित केले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
वेळापत्रक लवकरच जाहीर
राज्यातील शासकीय, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक संस्थांमधील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज करीत आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या गुणवत्ता यादीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येते. नीट परीक्षेतील गोंधळामुळे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. याबाबतचा पेच सुटल्यानंतर अखेर सीईटी कक्षाने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्कासह ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी फॉर्म न भरणाऱ्या विद्यार्थांचा या अभ्यासक्रमांच्या कोणत्याही कोट्यातील प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या 2024-25 सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शुल्कची रक्कम ही डिमांड ड्राफ्टद्वारे स्वीकारली जाते. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांमुळे बँकिंग व्यवहार बंद आहेत. अशात विद्यार्थ्यांना (B A M S) वेळेत डिमांड ड्रॉफ्ट काढणे अडचणीचे ठरत आहे. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बीएएमएस प्रवेशित विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेतली. त्यांनी आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यंत्रणेला सूचना
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया संदर्भातील शुल्क डिमांड ड्राफ्टऐवजी चेकद्वारे स्वीकारण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. सीईटी विभागाने यासंदर्भातील सुचना पत्रकच निर्गमित केले आहे. त्यामुळे आता (BAMS) आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना आता डिमांड ड्राफ्ट (डीडी) ऐवजी चेकद्वारे (धनादेश) प्रवेश प्रक्रिया शुल्क भरता येणार आहे.